मखरासाठी आणलेल्या थर्माकोलला आग
By admin | Published: July 15, 2017 03:01 PM2017-07-15T15:01:40+5:302017-07-15T15:01:40+5:30
आगीत तीन वर्षांचा मुलगा बालंबाल बचावला
आॅनलाईन लोकमत
देवरूख (जि. रत्नागिरी), दि. १५ : मखर करण्यासाठी आणलेल्या थर्माकोलला आग लागून घराचे छप्पर, मंडप व दुचाकीसह अनेक वस्तू जळून १ लाख ५९ हजार ३०० रूपयांचे नुकसान झाल्याची घटना गुरूवारी सकाळी घडली. या आगीत तीन वर्षांचा मुलगा बालंबाल बचावला आहे. कांजिवरा येथील बसाण्णा शिवपुत्र हळमणी यांच्या घरात ही आगीची घटना सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
हळमणी यांचे सुपुत्र शिवाजी, महादेव व लिंगाप्पा हे गणेशोत्सवासाठीची थर्माकोलची मखरे दरवर्षी बनवतात. मखरे बनवण्यासाठी ९० हजार रूपयांचा थर्माकोल आठ दिवसांपूर्वीच घराला लागून असलेल्या मंडपात आणून ठेवला होता. सकाळी ९.३०च्या सुमारास घराच्या मंडपात आगीचे तांडव सुरू झाले. या थर्माकोेलच्या ढिगाला आग लागून हळमणी यांचे घर पूर्णपणे काळ्या धुरात बुडाले होते. आग लागलेल्या मंडपाशेजारीच शिवाजी हळमणी यांचा तीन वर्षांचा नील हा मुलगा झोपलेला होता.
आगीने रौद्ररूप धारण करून नील झोपलेल्या खोलीच्या खिडकीनेही पेट घेतला होता. खिडकीच्या स्लायडिंग काचा जळून गेल्या. यावेळी नील हा मुलगा झोपलेला आहे, हे लक्षात येताच नागरिकांनी त्या धुरात धाव घेऊन नील याला झोपलेल्या अवस्थेत उचलून बाहेर आणले. आगीत मंडपाचे पत्रे तसेच त्याला लागून असलेल्या घराचे पत्रे जळून खाक झाले. तसेच ९० हजार रूपयांच्या थर्माकोलची रांगोळी झाली. याच मंडपात लिंगाप्पा हळमणी यांची अॅक्टिव्हा दुचाकी ठेवण्यात आली होती. या गाडीचे वायरींग व इंजिनला जोडलेल्या कॉईल्स जळून खाक झाल्या. याच मंडपात दोन कपाटे ठेवण्यात आली होती. या कपाटात रंगांचे डबे, वायरिंग साहित्य होते. यात ड्रील मशीन, ग्रार्इंडर, मंडप सजावटीचे पडदे, ग्रीनेरी अशा प्रकारच्या वस्तूही जळून गेल्या.
साखरपा येथे बंद घर फोडून टीव्ही लांबवला
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा पत्कीवाडीतील बंद घर फोडून चोरट्याने १५ हजार रुपये किमतीचा टीव्ही लांबवल्याची घटना उघडकीस आली. साखरपा पत्कीवाडीतील कृष्णा सखाराम बार्इंग हे आपले घर बंद करून कामानिमित्त मुंबईला गेले होते. ते बुधवारी सकाळी ९ वाजता घरी आले असता बंद असलेल्या घराच्या दरवाज्याचे कुलूप त्यांना फोडलेले दिसले. यावरून आपल्या घरात चोरीचा प्रकार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात प्रवेश केला असता १५ हजार रुपये किमतीचा सॅन्सुई कंपनीचा ३२ इंची एलईडी टीव्ही चोरून नेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी साखरपा पोलीस ठाण्यात टीव्ही चोरीला गेल्याची फिर्याद दिली. यानुसार पोलिसांनी चोरट्याविरोधात ४५४, ४५७ व ३८० कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. टी. उकार्डे करीत आहेत.
कुवारबाव येथे ट्रक चोरीस
कुवारबाव परिसरातील ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी मोकळ्या जागेत उभा करून ठेवलेला ९ लाख रुपये किमतीचा ट्रक चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण अरविंद साळवी (४३, सुयोग सोसायटी, कुवारबाव) यांनी आपल्या ताब्यातील ट्रक दि. ११ जुलै रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास कुवारबाव ग्रामपंचायतीच्या बाजूला उभा करून ठेवला होता. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ट्रक घेण्यासाठी ग्रामपंचायतीजवळ आले. त्यावेळी त्यांना ट्रक जागेवर दिसून आला नाही.