दिव्यांगांच्या लसीकरणासाठी ‘त्यां’नी दिली माेफत रिक्षाची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:23 AM2021-05-29T04:23:58+5:302021-05-29T04:23:58+5:30
असगोली : गुहागर शहरातील रिक्षाचालक पराग भोसले यांनी दिव्यांग असणाऱ्या १६ व्यक्तींच्या लसीकरणासाठी विनाशुल्क रिक्षा माेफत उपलब्ध ...
असगोली : गुहागर शहरातील रिक्षाचालक पराग भोसले यांनी दिव्यांग असणाऱ्या १६ व्यक्तींच्या लसीकरणासाठी विनाशुल्क रिक्षा माेफत उपलब्ध करून दिली. पराग भाेसले यांनी दाखवलेल्या या दातृत्वामुळे लसीकरणासाठी जाणाऱ्या दिव्यांगांची गैरसाेय दूर झाली आहे.
दिव्यांग व्यक्तींसाठी जीवन शिक्षण शाळा येथे लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती. याठिकाणी लसीकरणासाठी येणाऱ्या दिव्यांगांसाठी गुहागर नगर पंचायतीकडून रिक्षाची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी गुहागर शहरातील खालचा पाट भागातील रिक्षाचालक पराग भोसले यांनी आपली रिक्षा दिली हाेती. त्यांनी गुहागर शहरातील १६ दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या घरापासून ते लसीकरण केंद्रांपर्यंत आणून लसीकरण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या घरी नेऊन सोडले. यासाठी त्यांनी कोणतेही शुल्क गुहागर नगर पंचायतीकडून घेण्यास नकार दिला.
समाजात अशी मोजकीच माणसे असतात की, जी नेहमीच समाजासाठी आपले काहीतरी योगदान राहील, यासाठी काम करतात. पराग भोसले हे त्यामधीलच एक आहेत. आज खूप भयंकर परिस्थिती आहे. या परिस्थितीत माणूसच माणसाच्या उपयोगी पडू शकतो़, ही माणुसकी जपण्यासाठी मोफत रिक्षाची सेवा दिल्याचे पराग भोसले यांनी सांगितले.