परदेशात मराठी वाढवली त्यांचे कौतुक केले पाहिजे : नमिता कीर
By मेहरून नाकाडे | Published: April 16, 2024 03:24 PM2024-04-16T15:24:52+5:302024-04-16T15:32:28+5:30
रत्नागिरी : परदेशात साहित्य संमेलन घेणारी कोमसाप पहिलीच संस्था आहे. मॉरिशस येथील पूर्वजांनी मराठी जतन केली. परदेशात मराठी वाढवली ...
रत्नागिरी : परदेशात साहित्य संमेलन घेणारी कोमसाप पहिलीच संस्था आहे. मॉरिशस येथील पूर्वजांनी मराठी जतन केली. परदेशात मराठी वाढवली त्यासाठी नक्कीच या लोकांचे कौतुक केले पाहिजे, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर यांनी केले.
कोकण मराठी साहित्य परिषद आणि श्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी संस्कृतीवर आधारित विशेष लोककलांचा कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर बोलत होत्या. यावेळी मॉरिशस मराठी कल्चरल सेंट्रल ट्रस्टचे अध्यक्ष पुतलाजी, मॉरिशस मराठी स्पिाकिंग युनिअनचे अध्यक्ष नितीन बाप्पू, इंटरनॅशनल कल्चरल अँड सोशल फोरम मॉरिशस दिलीप ठाणेकर, कोमसापचे मुख्य विश्वस्थ रमेश कीर, जयू भाटकर, गजानन पाटील उपस्थित होते.
मॉरिशस मराठी कल्चरल सेंट्रल ट्रस्टचे अध्यक्ष अर्जन पुतलाजी यांनी मनोगत व्यक्त करताना, भारतातील हा माझा तिसावा दौरा आहे. मॉरिशसला पूर्वज गुलाम म्हणून गेले. त्यांनी भाषा, संस्कृती टिकवण्याचे काम केले. पुढे जाऊन मराठी भाषा व संस्कृती जोपासण्याचे काम आम्ही करत आहोत. त्याला जोड म्हणून रत्नागिरीत होत असलेल्या या पहिल्या कार्यक्रमासाठी नमिता कीर यांनी पुढाकार घेतला असल्याचे सांगितले.
सुत्रसंचालन माधव अंकलगे यांनी केले. उद्घाटन सोहळ्यानंतर माॅरिशसच्या मंडळींनी विविध सांस्कृतिक कलांचे सादरीकरण केले. नृत्यातून गणेशवंदना, श्री विठ्ठल रखुमाई सादर केली. कोळीनृत्याचे ही सुरेख सादरीकरण केले. मराठी भाषेत एकांकिकेचेही सादरीकरण करून रसिकांकडून प्रशंसा मिळविली.