अभियोग्यता चाचणीनंतर ते उमेदवार ठरणार अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 03:21 PM2019-05-27T15:21:28+5:302019-05-27T15:23:02+5:30
टीईटी परीक्षा अनुत्तीर्ण असताना अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा काही उमेदवारांनी दिली आहे. त्यानंतर टीईटी परीक्षा देऊन, पवित्र पोर्टलवर तशी नोंद करणारे उमेदवार शिक्षक भरतीसाठी अपात्र ठरविले जाणार आहेत.
रत्नागिरी : टीईटी परीक्षा अनुत्तीर्ण असताना अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा काही उमेदवारांनी दिली आहे. त्यानंतर टीईटी परीक्षा देऊन, पवित्र पोर्टलवर तशी नोंद करणारे उमेदवार शिक्षक भरतीसाठी अपात्र ठरविले जाणार आहेत.
शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शकरित्या राबवण्यासाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांमधील बारा हजार शिक्षकांच्या पदांसाठी पहिल्या टप्प्यात भरती प्रक्रिया राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी एक लाख २३ हजार उमेदवारांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे.
नोंदणीकृत उमेदवारांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी नवीन सर्व्हर विकसित करण्यात आला आहे. त्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सर्व्हरची तांत्रिक तपासणी चालू असून, गेल्या काही दिवसांपासून पवित्र पोर्टलच बंद ठेवण्यात आले आहे. त्यावर कोणत्याही सूचना प्रसिध्द करण्यात येत नसल्याने उमेदवारांकडून नाराजी व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात भरती प्रक्रिया कधी सुरू होणार असा प्रश्न उमेदवारांकडून उपस्थित होत आहे.
शिक्षक भरतीसाठी शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) व अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा उत्तीर्ण होण्याची सक्ती केली आहे. टीईटी उत्तीर्ण नसताना काही उमेदवारांनी अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा दिली आहे. डिसेंबर २०१७ मध्ये अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर दि.१५ जुलै २०१८ रोजी टीईटी परीक्षा घेण्यात आली होती.
अभियोग्यता चाचणीनंतर टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदी केल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. मात्र या नोंदी इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षक पदांसाठी ग्राह्य धरण्यात येणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.