पर्यटन हंगामात थिबा पॅलेसची दुरूस्ती

By admin | Published: June 3, 2016 10:37 PM2016-06-03T22:37:20+5:302016-06-04T00:40:50+5:30

पर्यटकांमध्ये नाराजी : बांधकाम अपूर्ण असल्याने तेथे येणाऱ्या पर्यटकांचा होतोय भ्रमनिरास

Thiba Palace correction in tourist season | पर्यटन हंगामात थिबा पॅलेसची दुरूस्ती

पर्यटन हंगामात थिबा पॅलेसची दुरूस्ती

Next

रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील ऐतिहासिक वारसा असलेल्या थिबा राजवाड्याची अवस्था दयनीय आहे. १९९८ पासून या राजवाड्याचे काम अतिशय संथगतीने सुरु आहे. त्यामुळे येथे जाणाऱ्या जुन्या जाणत्या पर्यटकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ठेकेदाराची बेपर्वाई व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने या ऐतिहासिक स्थळाची शान भविष्यात लुप्त होण्याचा धोका असल्याचे काही पर्यटकांनी सांगितले. ऐन पर्यटनाच्या हंगामातच हे काम सुरू असल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
इंग्रज सरकारच्या राजवटीत ब्रह्मदेशचा राजा थिबा याला येथे नजरकैदेत ठेवण्यात आले होते. थिबा राजाचे १९१६ मध्ये याच राजवाड्यात निधन झाले. त्यानंतर ‘थिबा पॅलेस’ म्हणून हा राजवाडा नावारुपास आला. एक ऐतिहासिक वास्तू जतन करण्याच्या हेतूने शासनाच्या पुरातत्व विभागाने ते संरक्षित स्मारक म्हणून १९९८ मध्ये घोषित केले. तेव्हापासून या राजवाड्याच्या देखभाल, दुरुस्ती व नुतनीकरणाचे काम सुरु करण्यात आले. गेली १८ वर्ष हे काम अतिशय संथगतीने सुरु असून, भविष्यात ते पुरे होईल की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. ठेकेदार व प्रशासन यांच्यातील अंतर्गत वादामुळे हे काम रखडले आहे.
दरवर्षी हजारो पर्यटक थिबा पॅलेसला भेट देतात. परंतु, तेथील अस्ताव्यस्त पडलेले सामान आणि घाणीचे साम्राज्य यामुळे पर्यटकांच्या मनाला वेदना होतात. दूरवरुन येथे आल्यानंतर अनेकांचा भ्रमनिरास होतो. थिबा राजवाड्याची माहिती वाचून किंवा ऐकून मोठ्या उत्कंठेने पर्यटक येथे येतात. परंतु, येथे आल्यानंतर येथील राजवाड्याचे भग्न स्वरुप पाहिल्यानंतर त्यांचा अपेक्षाभंग होतो. थिबा पॅलेसच्या नुतनीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे व या ऐतिहासिक वास्तूचा बाज कायम ठेवावा, अशी मागणी पर्यटकांतून होत आहे. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या थिबा राजवाडा पाहण्यासाठी आल्यानंतर याठिकाणी इतरत्र पडलेल्या सामानाचे दर्शन घडते. गेले कित्येक दिवस हे काम सुरू असल्याने ते नेमके पूर्ण कधी होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याकडे पुरातत्व खात्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)


ऐतिहासिक ठेवा : दुरूस्ती अभावी पर्यटकांची निराशा
रत्नागिरीतील ऐतिहासिक ठिकाणी म्हणून थिबा पॅलेस ओळखले जाते. या ठिकाणचा इतिहास वाचून अनेक पर्यटक याठिकाणी भेट देण्यासाठी येतात. याठिकाणी थिबा राजाला बंदी करून ठेवण्यात आल्याने या पॅलेसला महत्व प्राप्त झाले आहे. येथील ऐतिहासिक वस्तू पाहण्यासाठी पर्यटकांची रांग लागते. सध्या या पॅलेसची दुरूस्ती सुरू असल्याने पर्यटकांना हे ठिकाण पाहता येत नाही.

कामाकडे दुर्लक्ष
थिबा पॅलेस ही वास्तू पुरातत्व विभागाच्या अखत्यारित आहे. त्याची देखभाल दुरूस्ती याच विभागाच्या अधिकाराखाली केली जात आहे. मात्र, ठेकेदाराकडून दिरंगाईने चाललेल्या कामाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्यानेच हे काम रेंगाळल्याचे दिसत आहे.

Web Title: Thiba Palace correction in tourist season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.