चोरलेल्या मोबाईल्ससह चोरट्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 01:43 PM2019-09-24T13:43:14+5:302019-09-24T13:44:24+5:30
खेड शहर बाजारपेठेतील ओमसाई मोबाइल शॉपी फोडून तब्बल साडेपाच लाख रुपये किमतीचे ४१ किमती मोबाईल हॅण्डसेट चोरून नेणारा संशयित आरोपी तुषार रामचंद्र गावडे (रा. अॅन्टॉप हिल, मुंबई. मूळ रा. तिसे, ता. खेड) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुंबई येथे अटक केले. त्याने चोरलेला ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.
रत्नागिरी : खेड शहर बाजारपेठेतील ओमसाई मोबाइल शॉपी फोडून तब्बल साडेपाच लाख रुपये किमतीचे ४१ किमती मोबाईल हॅण्डसेट चोरून नेणारा संशयित आरोपी तुषार रामचंद्र गावडे (रा. अॅन्टॉप हिल, मुंबई. मूळ रा. तिसे, ता. खेड) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुंबई येथे अटक केले. त्याने चोरलेला ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.
१८ सप्टेंबर २०१९ रोजी रात्री खेड बाजारपेठेतील ओमसाई मोबाईल शॉपीमध्ये अज्ञाताने ५ लाख ४६ हजार ७०६ रुपयांचे ४१ मोबाईल हँडसेट चोरून नेले होते. या चोरीप्रकरणी प्रवीण पवार यांच्या तक्रारीवरुन खेड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ४५४, ४५७ व ३८०नुसार गुन्हा दाखल केला होता.
तुषार रामचंद्र गावडे याने चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडे असलेले साडेपाच लाख रुपये किमतीचे ४१ मोबाईल हॅण्डसेट पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या मोबाईल शॉपीमध्ये झालेल्या चोरीनंतर पोलिसांनी विविध भागात चोरट्यांच्या मागावर पथके पाठवली होती. मुंबई येथेही खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार अॅन्टॉप हिल (मुंबई) येथे जात पोलिसांनी संशयित आरोपी तुषारला ताब्यात घेतले. याशिवाय तुषारने गणेश गिल्डा यांच्या दुकानातील ३६ हजार रुपये किमतीचे तीन एलईडी टीव्ही चोरल्याची कबुलीही दिली आहे. तुषारला खेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने, कॉन्स्टेबल संजय कांबळे, शांताराम झोरे, राकेश बागुल, नितीन डोमणे, रमीझ शेख, दत्ता कांबळे आदींनी यशस्वी केली.