कोरोनामुळे चोरटेही घरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:25 AM2021-05-03T04:25:39+5:302021-05-03T04:25:39+5:30
रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन झाले आणि अनेक लोक घरीच थांबू लागले. या कारणासह कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या आणि संसर्गाच्या भीतीचा ...
रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन झाले आणि अनेक लोक घरीच थांबू लागले. या कारणासह कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या आणि संसर्गाच्या भीतीचा परिणाम चोरट्यांवरही झाला आहे. काेराेनाच्या भीतीमुळे चोऱ्यांचेही प्रमाण घटले असल्याचे दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सन २०१९ मध्ये ३५६, सन २०२० मध्ये २३३ चाेरीच्या घटना घडल्या हाेत्या. मात्र, एप्रिल २०२१ अखेरपर्यंत केवळ ७८ चोरीच्या घटना घडल्या आहेत.
कोरोनाने सन २०२० मध्ये सगळी आर्थिक गणित बिघडून टाकली होती. पहिले काही दिवस सगळे व्यवहार ठप्प झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी ‘वर्क फ्राॅम होम’ला प्राधान्य देण्यात आले. जिल्ह्याच्या सीमा सील झाल्या तर पोलीस २४ तास रस्त्यावर तैनात झाले. या सर्व परिस्थितीचा परिणाम सामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत झाला. काेराेनामुळे अनेकजण घरात असल्याने चाेरट्यांनीही त्याचा धसका घेतला आहे. त्यामुळे चाेरीचे प्रमाण कमी झाले असून, एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत ७८ चाेरीच्या घटना घडल्याची नाेंद झाली आहे.
..........................
खुनाचे प्रमाण कमी
लाॅकडाऊनच्या कालावधीत खुनाचे प्रमाणही खूप कमी आल्याचे दिसत आहे. सन २०१९ मध्ये १५ खुनाच्या घटना घडल्या हाेत्या. तर सन २०२० मध्ये १७ घटना घडल्या हाेत्या. यावर्षी एप्रिल अखेरपर्यंत केवळ ३ खुनाच्या घटना घडल्या आहेत.
...............................
बलात्काराच्या घटनांमध्येही घट
लाॅकडाऊनमुळे सारेच घरात असल्याने नातेवाइकांचा एकमेकांशी संवाद वाढला आहे. अनेकजण आपल्या कुटुंबातच राहत असल्याने घरी एकटे राहण्याचे प्रमाण कमी झाले आहे. घरातील माणसे सुरक्षित आहेत. तसेच एकमेकांच्या घरी जाणेही बंद झाले आहे. याचा चांगला परिणाम दिसत असून, बलात्कारांच्या घटनांमध्येही घट झाली आहे. सन २०१९ मध्ये तब्बल ४७ बलात्काराच्या घटना घडल्या हाेता. सन २०२१ मध्ये ३९ हाेत्या तर यावर्षी एप्रिल अखेरपर्यंत २३ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत.
.............................
लोक सध्या घरात आहेत, तसेच पोलिसांची गस्तही सुरू आहे, हे चोऱ्या कमी होण्याचे एक प्रमुख कारण आहे. दुसरे कारण असे, की यंत्रणाही मेहनत घेतेय, त्यामुळे चोऱ्यांचा छडा लवकर लागतोय. चोऱ्यांमधील मुद्देमाल जास्तीत जास्त हस्तगत करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरते. गस्तीबरोबरही नाकाबंदी सुरुच आहे. घराच्या आवारात सीसीटीव्ही लावा व त्याचा डिव्हीआर सुरक्षित ठिकाणी ठेवा. नागरिकांनीही सतर्क राहावे. बाहेर जाताना योग्य ती खबरदारी घ्यावी.
डाॅ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी