चालत्या बसमध्ये चोऱ्या करत करत चोरटे पोहोचले महाबळेश्वरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 03:46 PM2020-08-19T15:46:53+5:302020-08-19T15:48:32+5:30

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील रस्त्यावरील खड्डे चुकवित मंद वेगाने जाणाऱ्या आराम बसमधून १३ ऑगस्ट रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमाराला सामानाची चोरी करण्यात आली होती.

The thieves reached Mahabaleshwar by stealing in a moving bus | चालत्या बसमध्ये चोऱ्या करत करत चोरटे पोहोचले महाबळेश्वरला

चालत्या बसमध्ये चोऱ्या करत करत चोरटे पोहोचले महाबळेश्वरला

Next
ठळक मुद्देचालत्या बसमध्ये चोऱ्या करत करत चोरटे पोहोचले महाबळेश्वरलाकशेडी घाटातील प्रकार, सहाजण ताब्यात

रत्नागिरी : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील रस्त्यावरील खड्डे चुकवित मंद वेगाने जाणाऱ्या आराम बसमधून १३ ऑगस्ट रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमाराला सामानाची चोरी करण्यात आली होती.

या चोरीप्रकरणी एकाला पोलादपूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर महाबळेश्वर पोलिसांनी नाकाबंदी केली असता हे सर्व पकडले गेले. या घटनेतील संशयितांनी दुचाकी आणि ओमनी व्हॅनची चोरी करून महाबळेश्वर गाठल्याची माहिती प्राथमिक तपासामध्ये उघड झालीे.

याप्रकरणी सुनील शंकर दामले (३५, साखरी, ता. गुहागर) यांनी फिर्याद दिली आहे. कशेडी घाटातील धामणदिवी गावाच्या वळणापासून सुरू झालेल्या खड्ड्यांच्या महामार्गावरून अतिशय मंद गतीने वळणे पार करीत बस जात होती. मुंबई ते गुहागर अशी प्रवासी वाहतूक करणारी पिंपळेश्वर ट्रॅव्हल्सची आराम बस (एमएच ०८ ई ९४७५) रत्नागिरीकडे येत होती. या चालत्या आरामबसच्या डिकीतील सामानाची चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी अशोक धर्मराज जाधव (४५, उंबरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) याला ताब्यात घेतले होते.

त्याने दिलेल्या माहितीनुसार हरी शहाजी शिंदे, अनिल लालासाहेब शिंदे, उत्तम सुंदर शिंदे, दत्तात्रय लालासाहेब शिंदे, संतोष पवार (सर्व रा. खामकरवाडी, उंबरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) या पाचजणांना ताब्यात घेतले आहे. सहाजणांना महाबळेश्वर पोलिसांकडून पोलादपूर पोलिसांकडे वर्ग केले आहे. या सहाजणांमध्ये एकजण बालगुन्हेगार असल्याने त्याला त्याच्या पालकांकडे सोपविण्यात आले आहे.

वाहनांची चोरी

धामणदिवीतील जंगलामधून ते भोगावच्या दिशेने गेले. कुडपण रस्त्यावर येऊन रानबाजिरे धरणाकडे येऊन तेथे एका ढाब्याजवळ थांबले. तेथे त्यांना दुचाकी आणि चारचाकी गाड्या दिसल्या. मात्र, चारचाकी गाड्यांना सेन्सर असल्याने त्यांनी आवाजाच्या भीतीने त्या चोरण्याचा प्रयत्न सोडला. कापडे येथे त्यांनी एक दुचाकी चोरली. त्यानंतर ते सर्वजण कापडे पेट्रोल पंपावर गेले. तेथे एका कामगाराची ओमनी व्हॅन चोरली.

पळताना ताब्यात

पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने ओमनी चोरी होऊनही त्यांचे वर्णन लक्षात आले नाही. त्यानंतर पाचजण महाबळेश्वर तपासणी नाक्यापर्यंत आले. तेथे ओमनी व्हॅनची झडती होण्याच्या शक्यतेमुळे ते व्हॅन तिथेच सोडून पळण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी महाबळेश्वर पोलिसांनी त्यांना पकडले. रात्रभर दरीखोऱ्यातून चालल्यामुळे त्यांचे पाय सोलले असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता सर्व प्रकार सांगितला.

धबधब्यावर केली सर्वांनी आंघोळ

पोलादपूर पोलिसांना दोन मोबाईल आढळून आले होते. त्यामध्ये या सर्वांचे धबधब्यावर आंघोळ करतानाचे फोटो होते. पोलिसांनी नजिकच्या पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यासाठी हे फोटो सर्वत्र व्हायरल केले. यानुसार दुसऱ्या दिवशी १४ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर पोलिसांनी तपासणी नाक्याजवळ एका ओमनी व्हॅन सोडून निघून जाताना अटक केली.

बॅगा चोरीला

या गुन्ह्यांत त्यांनी ८ प्रवाशांचे सुमारे २४ हजार ५०० रुपये किंमतीचे घरगुती वापराचे कपडे, चीजवस्तू, रोख रक्कम चोरली आहे. त्याचबरोबर गणपतीच्या सजावटीचे सामान असलेल्या बॅगा चोरीला गेल्या आहेत.
 

Web Title: The thieves reached Mahabaleshwar by stealing in a moving bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.