रत्नागिरीत चोरट्यांची दहशत, घरात घुसून वृद्धेला गंभीर जखमी करत दागिने केले लंपास
By अरुण आडिवरेकर | Published: October 31, 2022 05:04 PM2022-10-31T17:04:14+5:302022-10-31T17:04:54+5:30
महिलेच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूरला खासगी रुग्णालयात दाखल केले.
रत्नागिरी : घरात एकटी असल्याचा फायदा उठवून चोरट्याने घरात शिरुन वृद्धेच्या डोक्यात लोखंडी सळी मारुन गंभीर जखमी करत अंगावरील दागिने लंपास केले. हा प्रकार रविवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील नाणीज बस थांब्यानजीक सरोदेवाडी येथे घडला. विजया विलास केतकर (६५) असे जखमी वृद्धेचे नाव असून, त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
विजया केतकर यांच्या पतीचे अपघाती निधन झाले आहे. तर मुले रत्नागिरीला असतात. त्यामुळे त्या घरात एकट्याच असतात. पाळत ठेऊन हा प्रकार घडला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. चोरट्याने मागील दाराने घरात प्रवेश केला. चोरट्याने स्वयंपाक घरात असलेल्या केतकर यांच्या डोक्यात सळीचे दोन प्रहार केले. त्या रक्तबंबाळ होऊन खाली कोसळताच चोरट्याने त्यांच्या अंगावरील दागिने ओरबाडून घेतले, तसेच कपाटातील दागिने असे मिळून सुमारे साडेबारा तोळे दागिने घेऊन पोबारा केला. वृद्धेच्या एका हातातील सोन्याच्या बांगड्या त्याला काढता आल्या नाहीत. तर धावपळीत त्याने रिंगा व किरकोळ दागिने वाटेत टाकल्याचे पोलीस तपासात पुढे आले.
वृद्धेचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर त्यांना पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूरला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे. त्यांना अंमलदार मोहन कांबळे, संतोष कांबळे, राकेश तटकरी व अन्य सहाय्य करीत आहेत. पोलीस पाटील नितीन कांबळे, सरपंच गौरव संसारे, तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्ताराम खावडकर घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.