शैक्षणिक व्यवस्थेवर प्रकाश टाकणारी ‘गोष्ट’
By admin | Published: November 20, 2014 10:55 PM2014-11-20T22:55:06+5:302014-11-21T00:36:25+5:30
राज्य नाट्य स्पर्धा : नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मेहरुन नाकाडे ल्ल रत्नागिरी शासनाने प्राथमिक शिक्षकांवर लादलेली अशैक्षणिक कामे, एक शिक्षकी शाळा, अधिक भाराने खचलेल्या शिक्षकांचे अध्यापनाकडे होणारे दुर्लक्ष, तर बदलून आलेल्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी, शिक्षणाविषयी गोडी निर्माण करणाऱ्या शिक्षकांचे परिश्रम कथानक मांडताना त्याला दिलेल्या विनोदी झालरीमुळे प्रेक्षागृहातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘गोष्ट एका शाळेची’मध्ये शैक्षणिक व्यवस्था व त्याचे परिणाम एकूणच हलका फुलका विषय रंगविण्यासाठी लेखकाने (संजय सावंत, विनोद जाधव) महाभारतातील गुरू-शिष्य गोष्टीचा आधार घेतला. नाटकात दिग्दर्शक सुमित पवार यांनी फ्लॅशबॅकचा वापर केला. नाटकातील काही किरकोळ त्रुटी वगळल्या तर नाटक चांगलेच रंगले. बंड्या (योगेश हातखंबकर), धर्म (मयूर दळी), भीम (चंद्रकांत लिंगायत), नकूल (राकेश वेत्ये), सहदेव (दीपक माणगावकर), अर्जुन (सुरेंद्र जाधव), कृष्ण (श्रमेश बेटकर) ग्रामीण भागातील शाळेचे विद्यार्थी. मोरे मास्तर (सागर चव्हाण) शाळेवर अध्यापन करीत असत. मात्र, अध्यापनाव्यतिरिक्त अन्य गोष्टींमध्येच शिक्षक गुंतलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेविषयी गोडी कमी झालेली. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार नियमित देण्याऐवजी आठवड्यातून एकदाच देऊन शासनाकडून निधी लाटणारे, शालेय दुरूस्ती दाखवून पैसे उकळण्याचा मास्तरचा प्रकार विद्यार्थ्यांना माहीत होता. अध्यापनाऐवजी विद्यार्थ्यालाच वर्गात शिकवायला सांगून वर्गात चक्क झोपा काढणाऱ्या शिक्षकामुळे ग्रामस्थ नाराज होतात. बंड्या नामक विद्यार्थ्याला मारल्याने त्याची आई (अल्पना जोशी) मास्तरांचा पाणउतारा करते. मास्तराच्या बदलीची विनंती प्रशासनाला केली जाते. अखेर प्रशासनाकडून मोरे मास्तरांच्या बदलीचे आदेश येतात. परंतु मास्तरला जाण्याची इच्छा नसल्याने तो विद्यार्थ्यांशी गोड गोड बोलून त्यांना फितवण्याचा प्रयत्न करतो. नवीन बदलून आलेले झगडे मास्तर (तुषार विचारे) यांना विद्यार्थी भूत बनवून घाबरविण्याचा प्रयत्न करतात. परंतु मास्तर घाबरल्याचे नाटक करतात. विद्यार्थ्यांच्या चुका पोटात घालीत त्यांच्यावर प्रेम करतात. मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करतात. निसर्गाच्या सानिध्यातील अभ्यास, कविता यामुळे विद्यार्थ्यांनाही झगडे मास्तरविषयी आपुलकी वाटते. परंतु मोरे मास्तर बंड्याचा वापर करून मास्तराविरोधी कट आखतो. बंड्या वर्गात गैरहजर असल्याविषयी मास्तर कारण विचारतात. मात्र, उलटसुलट उत्तरे देतो. मास्तर वैतागतात. बंड्या फास लावून आत्महत्या करण्याची धमकी देतो. त्यातच मोरे मास्तरांचे आगमन होते. बंड्या अखेर गावातील लोकांना मास्तरांविषयी भडकावतो. आईला घेऊन वर्गात येतो. मास्तरांना कल्पना असते की, बंड्याची आई आता पाणउतारा करणार. परंतु वेगळेच घडते. त्या चक्क बंड्याचीच कानउघाडणी करतात. यासाठी दिग्दर्शकांनी वापरलेला फ्लॅशब्लॅक उत्कृष्ट ठरला. मास्तर गुरूपौर्णिमेचे आयोजन करून प्रमुख पाहुणे म्हणून मोरे मास्तरांना बोलावतात. शिवाय बंड्याच्या आईलाही आमंत्रण देतात. मास्तर मुलांना गुरू-शिष्य गोष्ट सांगतात. त्यासाठी महाभारतातील द्रोणाचार्य व त्यांचे पाच शिष्य धर्म, भीम, नकूल, सहदेव, अर्जुन परंतु द्रोणाचार्यांनी एकलव्यास धनुर्विद्या शिकविण्यास नकार दिल्यामुळे तो त्यांचा पुतळा बनवून स्वत:च धनुर्विद्या शिकवितो. याच कथानकास विनोदी झालर देऊन सध्या डोनेशन उकळण्याच्या वृत्तीकडे लक्ष वेधले आहे. एकलव्य अर्जुनापेक्षा वरचढ ठरू नये, यासाठी त्याचा अंगठा मागणारे द्रोणाचार्य परंतु नाटकात चक्क द्रोणाचार्य गुरूदक्षिणा नाकारतात. याठिकाणीही फ्लॅशबॅक वापरण्यात आला. मोरे मास्तर यांना गुरूपौर्णिमेची भेट म्हणून शाळेत रूजू होण्याचे सांगतात. परंतु झगडे मास्तरांची अध्यापनातील एकनिष्ठता, विद्यार्थ्यांविषयी प्रेम, शासकीय कामकाज नित्यनियमाने पूर्ण करण्याची त्यांची निष्ठा, मुलांच्या मनातील भीती काढून, अवखळपणा झेलत त्यांच्या कलेने विधायक मार्गाकडे वळविण्याचा प्रयत्न यामुळे प्रेरित होऊन बोध घेण्याचे आश्वासन मोरे मास्तर देतात.अखेर बंड्या शिक्षण घेऊन ‘डॉक्टर’ होण्याचे आईचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन देतो. एकूणच नाटकाचा शेवट गोड होतो. रंगमंचावर शाळेचे नेपथ्य उभारण्यात आले होते. मात्र, गुरू-शिष्य गोष्टीवेळी ते बदलण्यात आले. सरकते नेपथ्य असले तरी ते सरकविण्यास थोडा विलंब झाला. मोरे मास्तर वयस्कर दाखविण्यात आले. पात्र निवड चुकीची वाटली. परंतु समस्त विद्यार्थीवर्गाने आपला अभिनय मात्र उत्कृष्ट सादर केला. शिक्षण पध्दतीला, समाजव्यवस्थेला दोष देण्यापेक्षा दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या तर ते सहज शक्य होते. हे लेखकांनी दाखवून दिले. नाटकांमधील नृत्य, गाणी, संगीतामुळे प्रेक्षक शेवटपर्यंत खिळून होते.