पक्षासाठी काम करेल त्याचाच विचार
By Admin | Published: March 15, 2015 09:23 PM2015-03-15T21:23:41+5:302015-03-16T00:14:56+5:30
विनय नातू : जिल्हा बँक निवडणुकीत भाजप महत्त्वाच्या भूमिकेत
देवरूख : भारतीय जनता पार्टीसाठी जो वेळ देऊन काम करेल त्यालाच पदे देताना विचार केला जाईल, यासाठी कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना वाठवण्यासाठी स्वत:ला झोकून द्यावे, असे आवाहन माजी आमदार, कोकण प्रभारी डॉ. विनय नातु यांनी देवरुख येथील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना केले. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपाने अद्याप कोणताच निर्णय घेतला नसून, यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.
देवरुख येथील नक्षत्र सभागृहात संगमेश्वर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, देवरुखच्या नगराध्यक्षा राजवाडे, जिल्हा परिषद सदस्या मिनाक्षी दीपक जाधव, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मंदार भिडे, नगरसेवक आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुका कार्यकारिणी सचिव रूपेश भागवत यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सुरुवातीला तालुक्यात सुरु असलेल्या भाजप सदस्य नोंदणीचा आढावा घेण्यात आला. ३१ मार्च ही सदस्य नोंदणीची अखेरची तारीख असल्याने तालुक्यात सदस्य नोंदणी मोहीम प्रभावीपणे राबवण्यात यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. केंद्र आणि राज्य शासन ज्या लोकोपयोगी योजना राबवत आहे, तसेच लोकांच्या कल्याण्याचे जे निर्णय घेत आहे ते तळागाळात पोहचवण्यात यावेत, अशा सूचना कार्यकर्त्यांना करण्यात आल्या. तालुक्यातील विभागवार विकास कामांचा आढावा तयार मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्री यांच्यापर्यंत सादर करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महत्वाच्या भूमिकेत असेल, यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे आवानही करण्यात आले. जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी झालेल्या चर्चेत माजी तालुका अध्यक्ष मुकुंदराव जोशी, सुरेश गांधी, दीपक जाधव, कुंदन कुलकर्णी, नगरसेवक भुरवणे, पंचायत समिती माजी सदस्य जाकीर शेकासन, अमित केतकर आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)