सहकार खात्याच्या थिंक टँकमध्ये ॲड. दीपक पटवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:37 AM2021-09-09T04:37:43+5:302021-09-09T04:37:43+5:30
रत्नागिरी : सहकार खात्याने राज्यातील सहकार चळवळीतील कार्यपद्धतीमधील त्रुटी व करावयाच्या सुधारणा याबाबत अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट गठीत ...
रत्नागिरी : सहकार खात्याने राज्यातील सहकार चळवळीतील कार्यपद्धतीमधील त्रुटी व करावयाच्या सुधारणा याबाबत अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट गठीत केले आहेत. पतसंस्था चळवळीबाबत अभ्यास करण्यासाठी उपसमिती गठीत करण्यात आली असून, त्या समितीत रत्नागिरीतील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील ११ सदस्यांचा अभ्यास गट तयार करण्यात आला आहे. सहकार चळवळीतील दोष, त्रुटी शोधणे, त्यावर उपाययोजना सुचवणे असे त्याचे स्वरूप आहे. अपर निबंधक डॉ. पांडुरंग खंडागळे यांच्यासह सहा वरिष्ठ अधिकारी, तसेच अन्य ५ सदस्य असा अभ्यास गट निर्माण करण्यात आला आहे. महाराष्ट्र सहकार कायद्यात बदल अपेक्षित आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा अभ्यास गट महत्त्वपूर्ण असून, नवीन तरतुदी सुचवून सहकार चळवळ गतिमान करण्यासाठी या अभ्यास गटाने काम करणे अपेक्षित आहे.
सहकार चळवळीतील अभ्यास गटात समावेश होणे ही खूप उत्तम संधी आहे. आपला अनुभव, कायद्याबाबतची माहिती वापरुन पतसंस्था चळवळ अधिक गतिमान व्हावी म्हणून प्रस्ताव सुचवता येतील, याचे आपल्याला समाधान आहे, अशी प्रतिक्रिया ॲड. पटवर्धन यांनी व्यक्त केली.