रत्नागिरीतील लोटेत अमली पदार्थ कारखाना सुरु करण्याचा डाव, अन्...; ठाण्यात सात जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 12:24 PM2023-03-24T12:24:29+5:302023-03-24T12:24:50+5:30
कुंतल व उत्तर प्रदेशातील कारखाना चालविणारा संतोष सिंग यांनी मिळून ऑक्टोबर २०२२ मध्ये लोटे येथे ड्रग्ज फॅक्टरी उभारण्याचा प्लान आखला होता
रत्नागिरी : ठाण्याच्या अमली पदार्थविरोधी पथकाने सात जणांना अटक केली आणि त्यातील एका आरोपीच्या मोबाइलमुळे धक्कादायक प्रकार उघड झाला. उत्तर प्रदेशातील अमली पदार्थांच्या कारखान्याला टाळे ठोकण्यात आल्याने आता लोटे औद्योगिक परिसरात कारखाना सुरू करण्याची तयारी या आरोपींनी केली होती. मात्र, त्यांच्या अटकेमुळे हा प्लान फसला आहे. आता हे आरोपी लोटे भागातील कोणाच्या संपर्कात होते का? याची चाचपणी केली जात आहे.
मेफेड्रीन या अमली पदार्थाच्या निर्मितीसाठी कारखानाच सुरू करण्याच्या बेतात असलेल्या नफीस पठाण (३३, रा. मुंब्रा) याच्यासह सात जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मंगळवारी दिली. त्यांच्याकडून चार लाख ६८ हजारांच्या एमडी पावडरसह १४ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एक टोळके परराज्यातून एमडी या अमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्याआधारे अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या जितेंद्र चव्हाण (३३, रा. कोलशेत, ठाणे) आणि सचिन चव्हाण उर्फ गट्ट्या भाई (३८, रा. कोलशेत रोड, ठाणे) या दोघांना सापळा रचून काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनेश कोडमूर (३७, रा. नवी मुंबई) यालाही अटक करण्यात आली. त्याने सात किलो एमडी पदार्थ सलाउद्दीन शेख उर्फ मामा याच्याकडून खरेदी केल्याचे तसेच शेख हा अभिषेक कुंतल उर्फ सरजी याच्यासाठी काम करत असल्याची माहितीही समोर आली. त्याच आधारे सलाउद्दीन शेख (४१, रा. मुंब्रा) आणि अभिषेक कुंतल (५४, रा. रसायनी, रायगड) यांनाही अटक केली आहे.
कुंतल हा हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील अन्य काही लोकांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले. उत्तर प्रदेशातील एमडी तयार करण्याचा कारखाना रेव्हिन्यू इंटेलिजन्सने बंद केल्याने लोटे औद्योगिक वसाहतीत हा कारखाना सुरू करण्याचा कुंतलचा प्लान होता. त्याचा मोबाइल ठाणे अमली पदार्थविरोधी पथकाने जप्त केल्याने ही माहिती उघड झाली.
जागाही पाहिली होती
कुंतल व उत्तर प्रदेशातील कारखाना चालविणारा संतोष सिंग यांनी मिळून ऑक्टोबर २०२२ मध्ये लोटे येथे ड्रग्ज फॅक्टरी उभारण्याचा प्लान आखला. या दोघांनी खेडमधल्या लोटे एमआयडीसी येथे एक जागा बघून तेथे ड्रग्ज बनविण्यासाठी लागणाऱ्या मशिनही खरेदी केल्या होत्या. मशिन पुरविणाऱ्या दोघांनाही ठाणे पोलिसांनी अटक केली असून, ड्रग्ज बनविण्यासाठी लागणारे रिॲक्टर व सेंटीफ्यूज जप्त केले आहेत, अशी माहिती ठाणे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली.