यंदा पाऊसमान सामान्यच, हवामान विभागाचे महासंचालक डाॅ. मृत्यूंजय माेहपात्रांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 03:05 PM2022-04-14T15:05:25+5:302022-04-14T15:05:48+5:30
सध्याच्या दाेन टप्प्यातील अंदाज धाेरणात बदल करुन देशभरातील नैऋत्य माेसमी पावसासाठी मासिक आणि हंगामी अंदाज प्रसिद्ध करण्यासाठी नवीन धाेरण लागू
रत्नागिरी : गतवर्षी अतिवृष्टीचा सामना करावा लागला असतानाच यावर्षी मात्र जून ते सप्टेंबर महिन्यात संपूर्ण देशात पाऊस सामान्य (सरासरीच्या ९६ - १०४ टक्के) राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डाॅ. मृत्यूंजय माेहपात्रा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. १९७१ - २०२० या कालावधीतील पावसाचा अभ्यास करता यावर्षी पावसाची दीर्घ कालावधीची सरासरी ८७ सेंटीमीटर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावर्षीच्या २०२२च्या नैऋत्य माेसमी पावसाची माहिती देण्यासाठी गुरुवारी ऑनलाईन पत्रकार परिषद आयाेजित करण्यात आली हाेती. या पत्रकार परिषदेत डाॅ. मृत्यूंजय माेहपात्रा यांनी यावर्षी पाऊस सामान्य राहणार असल्याचे सांगितले. भारतीय हवामान विभागाकडून संपूर्ण देशभरातील सरासरी पावसाचा दीर्घकालीन पूर्वानुमान दाेन टप्प्यांत प्रसिद्ध केला जाताे. पहिल्या टप्प्याचा अंदाज एप्रिलमध्ये तर दुसरा टप्पा किंवा अपडेट अंदाज मे अखेरीला प्रसिद्ध केला जाताे.
सध्याच्या दाेन टप्प्यातील अंदाज धाेरणात बदल करुन देशभरातील नैऋत्य माेसमी पावसासाठी मासिक आणि हंगामी अंदाज प्रसिद्ध करण्यासाठी नवीन धाेरण लागू करण्यात आल्याची माहिती डाॅ. माेहपात्रा यांनी दिली. नवीन पद्धतीमध्ये विद्यमान सांख्यिकीय अंदाज प्रणालीसह भारतीय हवामान विभागाच्या मान्सून मिशन क्लायमेट फाेरकास्ट सिस्टीमसह विविध जागतिक हवामान अंदाज आणि संशाेधन केंद्रांवर आधारित नवीन विकसित मल्टी - माॅडेल एन्सेम्बल अंदाज प्रणाली वापरण्यात आल्याचे डाॅ. माेहपात्रा यांनी सांगितले.
हवामान विभागाने १९७१ - २०२० या कालावधीतील पावसाचा अभ्यास करुन अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार जून ते सप्टेंबर महिन्यात देशभरात पावसाचे प्रमाण सामान्य राहणार आहे. द्विपकल्पीय भारताच्या उत्तरेकडील भाग आणि लगतच्या मध्य भारताच्या अनेक भागांमध्ये, हिमालयाच्या पायथ्याशी आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये सामान्य ते सामान्यापेक्षा जास्त माेसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य भारत, उत्तर भारत आणि दक्षिण द्विपकल्पीय दक्षिण भागात काही भागात सामान्य ते सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.