खालगाव-जाकादेवी बाजारपेठेत व्यापाऱ्यांसह ग्राहकांचीही सरसकट चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:21 AM2021-06-19T04:21:58+5:302021-06-19T04:21:58+5:30
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील खालगाव ग्रामपंचायत खालगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र जाकादेवी यांच्या संयुक्त विद्यमाने जाकादेवी बाजारपेठेतील व्यापारी तसेच ...
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील खालगाव ग्रामपंचायत खालगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र जाकादेवी यांच्या संयुक्त विद्यमाने जाकादेवी बाजारपेठेतील व्यापारी तसेच खरेदीसाठी दुकानात येणार्या ग्राहकांची सरसकट आरटीपीसीआर व अँटिजन चाचणी करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. दाेन दिवसात सुमारे दीडशे नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. उर्वरित व्यापारी व जाकादेवी बाजारपेठेमध्ये फिरणाऱ्या नागरिकांची सरसकट कोरोना चाचणी केली जात आहे.
खालगाव - जाकादेवी बाजारपेठ परिसरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायत खालगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र जाकादेवी यांच्या पुढाकाराने कोरोना चाचणी करण्याची मोहीम दि. १५ जूनपासून सुरू केली आहे. खालगाव, जाकादेवी बाजारपेठेमध्ये कोरोना संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी खालगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खालगावचे युवा सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष मधुकर रामगडे, पोलीस पाटील प्रकाश जाधव, ग्रामविकास अधिकारी डडमल, ग्रामपंचायतीचे सक्रिय सदस्य दीपक कातकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी महेश मोरताडे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, पदाधिकारी कोरोना चाचणीसाठी मेहनत घेत आहेत.
व्यापारी तसेच ग्राहक यांची कोराना चाचणी पूर्ण केल्यानंतर स्थानिक नागरिकांचीही कोरोना चाचणी करण्याचा संकल्प ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार असल्याचेही खालगावचे सरपंच प्रकाश खोल्ये यांनी सांगितले. पावसामध्ये शेतीकामाला सुरुवात झाली असतानाही जाकादेवी बाजारपेठेमध्ये विनाकारण फिरणारे लोक जास्त प्रमाणात असल्याचे अनेकांच्या दृष्टीस आले. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या माध्यमातून परिसरात कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक बाब म्हणून कोरोना चाचणीही ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेला ग्रामीण पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार किशोर जोशी, पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश खापरे यांची उत्तम साथ लाभत आहे. या मोहिमेबद्दल सूज्ञ नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
------------------
खालगाव-जाकादेवी बाजारपेठेत कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी सरपंच प्रकाश खोल्ये व शासकीय कर्मचारी उपस्थित हाेते.