‘त्या’ पुरातन मूर्तींचा अहवाल वर्ग

By admin | Published: March 25, 2016 10:28 PM2016-03-25T22:28:36+5:302016-03-25T23:42:49+5:30

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल : धामणदिवीत उत्खननवजा सपाटीकरण

'Those' ancient idols report class | ‘त्या’ पुरातन मूर्तींचा अहवाल वर्ग

‘त्या’ पुरातन मूर्तींचा अहवाल वर्ग

Next

आवाशी : धामणदिवी - बर्डेवाडी (ता. खेड) येथे सुरू असलेल्या उत्खननवजा सपाटीकरणात आढळलेल्या गावदेवीच्या पुरातन मूर्तींबाबत ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची खेड महसूल विभागाने दखल घेतली आहे. तसा अहवाल तयार करून पुरातत्व विभाग, रत्नागिरी यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याचे मंडळ अधिकारी एस. डी. वैद्य व धामणदिवीचे तलाठी किशोर घोळवे यांनी सांगितले.राष्ट्रीय महामार्गालगत सर्व्हे नं. १४४, हि. नं. १४, १६ या ठिकाणी मुंबईस्थित एक हॉटेल व्यावसायिक सपाटीकरणाचे काम करीत आहे. आॅक्टोबरमध्येही त्याने हे काम सुरु केले होते. त्याचवेळी तेथे पुरातन मूर्ती आढळल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर हे काम तत्काळ बंद ठेवण्यात आले. गेल्या आठ दिवसांपासून हे काम पुन्हा सुरु करण्यात आले आहे. याची माहिती घेतली असता या सपाटीकरणसाठी खेड तहसीलदारांनी नाहरकत दाखला दिला आहे. मात्र, मंदिर व मूर्तींची होणारी विटंबन रोखण्यासाठी कोणीच पुढे आले नसल्याचे दिसून आले. त्यानंतर ‘लोकमत’ने या घटनेवर प्रकाशझोत टाकल्यानंतर काही ग्रामस्थांनी ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द झालेली माहिती जिल्हाधिकाऱ्यांना सादर करून विनंती अर्ज सादर केला आहे.
यामध्ये त्यांनी या जागेतून मंदिर, मागील जमीनधारक व लगतच असलेल्या एका शिक्षण संस्थेच्या जमिनीवर कब्जा केल्याचे नमूद केले आहे. या ठिकाणी पुरातन देवस्थान आहे, आगामी काळात शिक्षण संस्था उभी राहणार असल्याचे ग्रामस्थांनी या अर्जात म्हटले आहे. त्यामुळे याठिकाणी अन्य व्यवसाय करून या जागेचे पावित्र्य नष्ट करू नये, अशीही विनंती केली आहे.
तेथे चाललेले हे काम केवळ सपाटीकरण नसून पाच मीटरपेक्षा जास्त उत्खनन होत असल्याची बाब महसूल अधिकाऱ्यांच्या लक्षात आणू देण्यात आली. याबाबत प्रत्यक्ष जागेवर गेल्यानंतर मोजमाप घेऊन दंडात्मक कारवाई करू, असे सांगण्यात आले आहे. त्या जमीनमालकाने महसूल खात्याच्या डोळ्यात धूळफेक करत सपाटीकरणाच्या नावाखाली उत्खनन व भरावाचे काम राजरोसपणे सुरू ठेवले असल्याचे पुढे आले आहे. हे काम थांबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)



अधिकाऱ्यांची भेट : अद्याप कारवाई नाही
‘लोकमत’मध्ये प्रसिध्द झालेल्या या वृत्तानंतर महसूलच्या अधिकाऱ्यांनी येथे भेट दिली. तसेच तलाठ्यांनी सपाटीकरण कामाच्या वेळी आढळलेल्या ‘त्या’ मूर्तींची पाहणी केली आहे. वरिष्ठ स्तरावरून मिळालेल्या सूचनेनुसार त्यांनी आपले काम केले. या जमीनमालकाने संधीचा पुरेपूर लाभ उठवत सपाटीकरणाच्या नावाखाली मंदिर, पाऊलवाट, मागील जमीनधारकांची पाऊलवाट, शिक्षण संस्थेच्या जागा यावर अतिक्रमण करून काही वृक्षांचीही कत्तल केल्याचे ग्रामस्थांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. ग्रामस्थांनी पत्र दिल्यानंतर अद्याप कोणती कारवाई करण्यात आलेली नाही. आगामी काळात या जमीन मालकावर कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

पुरातन मूर्ती
सध्या सुरू असलेल्या सपाटीकरणाच्या ठिकाणी सापडलेल्या मूर्ती पुरातन असल्याचे दिसत आहे. याठिकाणच्या मंदिरातील मूर्ती असाव्यात.

Web Title: 'Those' ancient idols report class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.