‘त्या’ दाेघांनी केले कोरोनाबाधित मृतावर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:33 AM2021-05-07T04:33:03+5:302021-05-07T04:33:03+5:30
राजापूर : कोरोनाच्या काळात रक्ताच्या नात्यामधील व्यक्तीही कोरोना रुग्णावर अंतिम संस्कार करण्यासाठी घाबरतात. मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठीही कोणी समोर येत ...
राजापूर : कोरोनाच्या काळात रक्ताच्या नात्यामधील व्यक्तीही कोरोना रुग्णावर अंतिम संस्कार करण्यासाठी घाबरतात. मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठीही कोणी समोर येत नसल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. या कठीण काळात राजापुरातील विनय गुरव व विजय गुरव या जोडीने गुरववाडी भागातील एका कोरोनाबाधित रुग्णाला आधी पीपीई किट घालून धाडसाने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेलेच, शिवाय त्या बाधिताचा मृत्यू झाल्यावर मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले. धाडसाने कोरोनाच्या कठीण काळात गुरव द्वयींच्या या सामाजिक सेवेने माणुसकी देखील झळाळली आहे.
राजापूर शहरातील एस. टी. आगारानजीकच्या गुरववाडी भागात सध्या वीस कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. मात्र, तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी या भागातील एका पंचावन्न वर्षीय नागरिकाला चार दिवस कोरोनाच्या लक्षणांनी ग्रासलेले होते. मात्र, घरापासून ग्रामीण रुग्णालयापर्यंत उपचारासाठी त्याला नेण्यासाठी कोणीही धजावत नव्हते. अखेर नगरसेवक विनय गुरव व माजी नगरसेवक विजय गुरव यांनी धारिष्ट्य दाखवत पीपीई किट परिधान करून त्या रुग्णाला एका रिक्षातून ग्रामीण रुग्णालयात नेऊन दाखल केले. यानंतर या द्वयींनी नदीकिनारी जात पीपीई किट जाळून टाकले व रिक्षा सॅनिटाइज केली.
यादरम्यानच ग्रामीण रुग्णालयात दाखल केलेल्या त्या रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आणि तेथेच त्याचे निधन झाले. ग्रामीण रुग्णालयातून याबाबत गुरव द्वयींना दूरध्वनी आला. आता प्रश्न होता मृतदेह ताब्यात घेण्याचा. मात्र, त्यासाठी कोणीही पुढाकार घेण्यास तयार नव्हते. त्यातच मृतदेहाचे सोपस्कार करून मृतदेह देण्यासाठी रुग्णालयातही एकच कर्मचारी असल्याने पुन्हा या दोन्ही आजी-माजी नगरसेवकांनी पीपीई किट चढवले आणि मृतदेह बांधून घेत रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीपर्यंत नेऊन अंत्यसंस्कारही केले.