ज्यांनी सुरुवात केली त्याला प्रत्युत्तर मनसैनिकांनी दिले; ठाणेतील प्रकारानंतर मंत्री उदय सामंत यांचा उद्धव सेनेवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 02:13 PM2024-08-12T14:13:23+5:302024-08-12T14:13:51+5:30
तिकीट देण्याचा अधिकार तीन नेत्यांना
रत्नागिरी : काेणत्याही नेत्यावर अशा पद्धतीने हल्ले करणे हे राजकारणात याेग्य नाही. राज ठाकरे यांच्या मराठवाडा दाैऱ्यात त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या टाकण्यात आल्या त्याचे पडसाद ठाण्यात उमटले. ज्यांनी सुरुवात केली त्याला प्रत्युत्तर मनसैनिकांनी दिले. आधी ज्यांनी केले त्याला धडा शिकविण्यासाठी दुसऱ्यांनी केले. सुरुवातीला ते झाले नसते तर त्याची प्रतिक्रिया उमटलीच नसती, अशी प्रतिक्रिया राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत प्रसार माध्यमांशी बाेलताना दिली.
ठाणे येथील घटनेबाबत प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारले असता ते बाेलत हाेते. ते म्हणाले की, राजकारणात आपण एकमेकांवर बाेलताे, बदनामी करताे ते आता क्रमप्राप्त झाले आहे. मात्र, अशा पद्धतीने हल्ला करणे याेग्य नाही. ही परिस्थिती सुरुवातीला काेणी निर्माण केली, याचाही महाराष्ट्राच्या जनतेने अभ्यास करणे गरजेचे आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.
त्यांनी सांगितले की, आपण आपल्या नेत्याच्या किती जवळ आहाेत ते दाखविण्याचा पहिल्यांदा मराठवाड्यात प्रयत्न झाला. आम्ही दाेन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला. तेव्हापासून हीनदर्जाचे बाेलले जाते, घाणेरडे बाेलले जाते, वाटेल त्या पद्धतीने टीका केली जाते, बदनामी केली जाते, हे सर्व आम्ही सहन करत आहाेत; पण हे सहन करताना लाेकसभेला दाखवून दिले की, आम्ही सरस आहाेत.
राजकारणात आम्ही टीकाटिपणी समजू शकताे; पण स्वत:च सुरुवात करायची आणि मग दुसऱ्याला दाेष द्यायचा ही प्रवृत्ती थांबली पाहिजे. शाब्दिक हल्ले समजू शकताे तेही करताना त्यात महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे. विकासाचे राजकारण झाले पाहिजे. जातीपातीचे राजकारण करायचे, जातीच्या, धर्माच्या भिंती निर्माण करायच्या हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.
त्याच्याशी काडीमात्र संबंध नाही
मनसे किंवा मनसैनिक एवढे दुबळे नाहीत की, त्यांना शिवसेनेची साथ घेऊन त्यांनी प्रतिक्रिया द्यावी. कालची उत्स्फूर्त प्रतिक्रिया हाेती, त्याच्याशी शिवसेनेचा काडीमात्रही संबंध नाही; पण एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा काहींनी विडाच उचललेला आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.
तिकीट देण्याचा अधिकार तीन नेत्यांना
राज्यात २० तारखेपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दाैरा सुरू हाेत आहे. त्या दाैऱ्याच्या संदर्भात काेकणातील समन्वय समितीची बैठक आहे. यामध्ये काेणत्याही तिकिटावर चर्चा हाेणार नाही. तिकीट देण्याचा अधिकार हा तीन नेत्यांना आहे. महायुती भक्कम असावी, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी, मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे तिघांचेही स्वागत करावे त्याचे नियाेजन करण्यासाठी ही बैठक असल्याचे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.