पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे हजारो वीज ग्राहक अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:32 AM2021-05-21T04:32:32+5:302021-05-21T04:32:32+5:30
राजापूर : महावितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वी करायची देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत न केल्याने, काम करणाऱ्या ठेकेदाराकडून अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे कामे ...
राजापूर : महावितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वी करायची देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत न केल्याने, काम करणाऱ्या ठेकेदाराकडून अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे कामे करून न घेतल्याने आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे राजापूर - लांजासह जिल्ह्यातील हजारो ग्राहक चार दिवस अंधारात आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते राजन देसाई यांनी केला आहे. पावसाळ्यापूर्वीची देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत झाली असती तर तौक्ते चक्रीवादळात महावितरणला कमी झळ बसली असती. त्यामुळे या परिस्थितीला महावितरणच्या अधिकाऱ्यांची मनमानी आणि पुढाऱ्यांच्या सोयीचे राजकारण कारणीभूत असल्याचा आरोप देसाई यांनी केला आहे.
रविवारी झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा महावितरणला सर्वाधिक फटका बसला आहे. राजापूर व लांजा तालुक्यात चार दिवस उलटले तरी अनेक गावांमध्ये अंधार आहे. मोठ्या प्रमाणावर खांब पडले आहेत, वीजवाहिन्या, कंडक्टरही तुटले आहेत. राजापूर व लांजा तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्येही हीच परिस्थिती आहे. याला सर्वस्वी महावितरणचे अधिकारी आणि कोकणातील फोटो काढून प्रसिध्दीची चमकोगिरी करणारे पुढारी कारणीभूत असल्याचा आरोप देसाई यांनी केला आहे. तौक्ते चक्रीवादळात महावितरणच्या कामाच्या कार्यकक्षा उघड झाल्या आहेत. झाल्या प्रकाराला महावितरणच्या अधिकाऱ्यांचा बेजबाबदार कारभार आणि पुढाऱ्यांची मनमानी कारणीभूत असल्याचा आरोप देसाई यांनी केला आहे.
पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून आवश्यक ती कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. मात्र, दरवर्षीच पावसाळ्यात महावितरणच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली जातात. यावर्षी पावसाळ्यापूर्वी झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने महावितरणला पुरते उघडे केले आहे. अनेक भागात महावितरणचे खांब बदलणे, वीजवाहिन्या बदलणे, कंडक्टर बदलणे, ट्रान्सफॉर्मर बदलणे ही कामे ठेकेदार पध्दतीने दिली जातात. मात्र, ठेकेदार काय करतात, याकडे ना महावितरणच्या अधिकाऱ्यांचे, ना पुढाऱ्यांचे लक्ष आहे. त्यामुळे काम शून्य आणि बिल अदा अशीही काही ठिकाणी परिस्थिती असल्याचा घणाघात देसाई यांनी केला आहे.
राजापूर तालुक्यात व रत्नागिरी जिल्ह्यात खासकरून समुद्र किनाऱ्यालगत असलेले खोब गंजतात, वीजवाहिन्या तुटण्याचे प्रमाण जास्त असते. त्याबाबत नियोजन करून ते बदलणे आवश्यक आहे. मात्र, तसे होत नाही, लोक, सामाजिक कार्यकर्ते वारंवार याकडे लक्ष वेधतात. पण महावितरणचे अधिकारी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात, असा टोला देसाई यांनी लगावला आहे. या संकटातही महावितरणचा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून, खांबावर चढून काम करणारा कर्मचारी मात्र जीवाची बाजी लावून काम करत आहे. मात्र तोही कंत्राटी म्हणूनच कामावर आहे. त्याच्या जीवाची आणि भविष्याची त्याला चिंता आहे. त्यामुळे विकासाच्या पोकळ गप्पा मारणाऱ्या पुढाऱ्यांनी त्यांच्या प्रश्नांकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी देसाई यांनी केली आहे.