पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:22 AM2021-06-03T04:22:31+5:302021-06-03T04:22:31+5:30
राजापूर : शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या काळात तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसाने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पाण्याच्या गळतीबाबत नगर ...
राजापूर : शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या काळात तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसाने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पाण्याच्या गळतीबाबत नगर परिषद प्रशासन गंभीर नसल्याची बाब वारंवार पुढे येत आहे. शहरात वरचीपेठ महापुरूष मंदिर रोड परिसरात गेले तीन ते चार दिवस पाईपलाईन फुटून दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रारी करूनही नगर परिषद प्रशासनाने कोणतीच दखल न घेतल्याने नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या बेजबाबदार कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
राजापूर शहराला दरवर्षी तीव्र पाणीटंचाई भेडसावते. प्रारंभी एक दिवसाआड तर मे महिन्यात दोन दिवसाआड शहरात पाणी पुरवठा केला जातो. यावर्षीही एप्रिलमध्ये एक दिवसाआड तर मेमध्ये दोन दिवसाआड पाणी दिले जात होते. मात्र, १६ मे रोजी झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने राजापूरकरांना दिलासा दिला. या कालावधीत मुसळधार झालेल्या पावसामुळे शहराला नैसर्गिकरित्या पाणी पुरवठा करणारे कोदवली धरण तुडुंब भरून वाहू लागले आणि शहरात पुन्हा एकदा नियमित सुरळीतपणे पाणी पुरवठा सुरू झाला.
दरवर्षी निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईतून आजही नगर परिषद प्रशासनाने काही बोध घेतलेला नाही, हे मात्र पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. गेले काही दिवस वरचीपेठ भागात कोंढेतडकडे जाणाऱ्या पाणी पुरवठा वाहिनीला गळती लागली आहे. दररोज या वाहिनीतून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. महापुरूष मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावरून रात्रं-दिवस हे पाणी वाहत आहे. याबाबत तक्रार करूनही नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने याकडे लक्ष दिलेले नाही.