हजारो व्यक्ती अन् कुटुंबांचा आधारवडच कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:31 AM2021-04-18T04:31:45+5:302021-04-18T04:31:45+5:30

रत्नागिरी : समाजसेवेची नुसती आवड असून चालत नाही, ती व्रत म्हणून अंगात भिनावी लागते. त्यासाठी कशाचीही तमा न ...

Thousands of people and their families collapsed | हजारो व्यक्ती अन् कुटुंबांचा आधारवडच कोसळला

हजारो व्यक्ती अन् कुटुंबांचा आधारवडच कोसळला

Next

रत्नागिरी : समाजसेवेची नुसती आवड असून चालत नाही, ती व्रत म्हणून अंगात भिनावी लागते. त्यासाठी कशाचीही तमा न बाळगता अहोरात्र काम करण्याची तयारी लागते. देवरुखमधील मातृमंदिरचा आधारवड असलेल्या शांता नारकर याही याच मुशीतून तयार झालेल्या. म्हणूनच असंख्य व्यक्तींचे, कुटुंबांचे आयुष्य सुकर करण्याचे काम त्यांच्या हातून घडले. शुक्रवार ,दि. १६ रोजी हा आधारवड कोसळला.

हजारो मुली, महिलांना त्यांनी आत्मविश्वासाने जगण्याची ताकद दिली. इतकी क्षमता त्यांच्यामध्ये आली ती त्यांच्यावर झालेल्या संस्कारातून. मातृमंदिर रुग्णालयाची स्थापना करणाऱ्या इंदिराबाई तथा मावशी हळबे यांची मानसकन्या ही शांता नारकर यांची पहिली ओळख. मावशींच्या देखरेखीत त्यांचे शालेय शिक्षण झालेच, पण इथेच मुळात त्यांच्यावर संस्कार सुरू झाले. गोपुरी आश्रमचे आप्पा पटवर्धन, ना. ग. गोरे, मधू दंडवते अशा खऱ्याखुऱ्या ‘समाजसेवकां’चा मातृमंदिरमध्ये सततचा वावर होता. त्यांच्या समाजवादी विचारसरणीचा खूप मोठा पगडा शांता नारकर यांच्यावर झाला. त्यामुळेच साधी राहणी आणि उच्च कोटीतील काम हा त्यांचा आयुष्याच्या अखेरपर्यंतचा अविभाज्य भाग होता.

मातृमंदिरसाठी अत्यंत तळमळीने काम करणारे विजय तथा भाऊ नारकर त्यांचे सहचर झाले. या जोडीने मातृमंदिरच्या कामाला, मावशींच्या स्वप्नाला वेगळ्याच उंचीवर नेले. ग्रामीण भागातील महिलांना ताठ मानेने जगता यावे, यासाठी त्यांना आर्थिक स्थैर्य देणे गरजेचे आहे, हे ओळखून शांता नारकर यांनी आतापर्यंत सुमारे ५८७ महिला बचत गटांची निर्मिती केली आहे. या बचत गटांचे फेडरेशन करून त्यांच्या चळवळीला पुढे नेण्याचे कार्य शांता नारकर यांनी केले आहे. बचत गटाच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये महिलांना स्वयंरोजगाराचे साधन मिळाले आहे. शेती विकासाबरोबरच गावांमध्ये बालवाड्या निर्माण केल्या आहेत. अनाथ मुलींसाठी सुरू केलेल्या गोकुळ या बालगृहात आज ५० मुली शिकत आहेत. पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी पाणी योजनांसाठी अनेक ठिकाणच्या ग्रामस्थांना प्रोत्साहित केले. त्यामुळे अनेक ठिकाणची समस्या सुटली. कामाचा हा उत्साह त्यांनी अखेरपर्यंत टिकवून ठेवला.

Web Title: Thousands of people and their families collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.