चिपळूणवर तिहेरी संकट; मदतीसाठी पूरग्रस्तांचा टाहो; यंत्रणेच्या उदासीनतेमुळे हजारोंचा जीव टांगणीला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 12:05 AM2021-07-23T00:05:16+5:302021-07-23T00:06:49+5:30
दिवसभरात लोकांपर्यंत मदत पोहोचलीच नसल्याने अनेकांचा जीव मेटाकुटीला
रत्नागिरी - कुणी स्वयंपाकघरात ओट्यावर दिवसभर उभे आहे, कुणी तासनतास पोटमाळ्याचा आधार घेतला आहे, अगदीच नाईलाज झाल्याने कुणी कौलावर चढून मुसळधार पावसात उभे आहे. जगण्यासाठीची ही धडपड आहे चिपळुणातील पूरग्रस्तांची.
पहाटेपासून आलेला महापूर अजून कायम आहे. पुन्हा समुद्राची भरती सुरू झाली आहे आणि पावसाचा जोर कायम आहे. भरीस भर कोळकेवाडी धरणातील पाणीसाठा वाढत असल्याने तेथून पाण्याचा विसर्ग कधीही करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे ही रात्र पूरग्रस्तांसाठी खूप अवघड ठरणार आहे.
तब्बल १३-१४ तास पुराचे पाणी कायम असल्याने आणि दिवसभरात लोकांपर्यंत मदत पोहोचलीच नसल्याने पुरात अडकलेले शेकडो लोक मदतीसाठी संदेश पाठवत आहेत. मात्र त्यांच्यापर्यंत मदत गेलेली नाही. एनडीआरएफचे जवान उशिरापर्यंत पोहोचलेले नाहीत. पुराच्या पाण्याचा वेग अधिक असल्याने फायबर बोटी त्यात टिकत नाहीत. त्यामुळे पूरग्स्तांना बाहेर काढण्याच्या कामाला गती आलेली नाही. स्थानिक स्वयंसेवी संस्था मदतीला गेल्या असल्या तरी तरी बोटी नसल्याने त्यांच्या मदतीला मर्यादा आल्या.
हेलिकॉप्टरने पूरग्रस्तांना मदत करण्याची घोषणा पालकमंत्री अनिल परब यांनी केली असली तरी दिवसभरात एकही हेलिकॉप्टर मदतीसाठी आले नाही. वीज नसल्याने सायंकाळनंतर सर्व भाग अंधारला आहे. त्यामुळे पूरग्रस्त भयभीत झाले असून मदतीसाठी टाहो फोडत आहेत.