आंब्यावर थ्रीप्सचे संकट, उत्पादन धोक्यात; संशोधन होत नसल्याने नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 06:16 PM2023-03-27T18:16:18+5:302023-03-27T18:16:43+5:30

बदलत्या हवामानामुळे उद्भवणाऱ्या समस्या, कीडरोग याबाबत संशोधन होत नसल्याने नाराजी

Threat of thrips on mango, production threatened | आंब्यावर थ्रीप्सचे संकट, उत्पादन धोक्यात; संशोधन होत नसल्याने नाराजी

आंब्यावर थ्रीप्सचे संकट, उत्पादन धोक्यात; संशोधन होत नसल्याने नाराजी

googlenewsNext

रत्नागिरी : बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा पिकावर होत असल्याने आंबा पीक उत्पादन खालावले आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा काहीच भागात आहे. अन्य भागात शेवटच्या टप्प्यातील आंबा आहे. मात्र, त्यावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव अधिक आहे. प्रतिबंधात्मक कीटकनाशक फवारणी करूनही थ्रीप्स आटोक्यात येत नसल्याने आंबा उत्पादन धोक्यात आले आहे.

यावर्षी पावसाळा लांबल्याने पालवीचे प्रमाण सर्वाधिक राहिले. त्यामुळे ८० टक्के झाडांना पालवी होती. दहा टक्के झाडांना मोहर होता तर दहा टक्के झाडे मोहोराशिवाय होती. दरवर्षीप्रमाणे थंडीचे प्रमाण कमी राहिले. अवकाळी पाऊस, तीव्र उष्मा यामुळे यावर्षी दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यात मोहर झालाच नाही. पहिल्या टप्प्यातील मोहराचा आंबा सध्या बाजारात आहे. मात्र, हा आंबा जिल्ह्यातील काही भागांतीलच आहे, अन्यत्र झाडे रिकामी असलेली निदर्शनास येत आहेत. जानेवारी / फेब्रुवारीतील थंडीमुळे काही ठिकाणी मोहर प्रक्रिया झाली. मात्र, ढगाळ हवामान, तीव्र उष्मा एकूणच विचित्र हवामानामुळे मोहराला फळधारणा झाली; परंतु गळ अधिक झाली. त्यातच तुडतुडा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव अधिक राहिला. यासाठी बागायतदार वारंवार कीटकनाशक फवारणी करत असून, अद्याप थ्रीप्सचे संकट आटोक्यात येत नसल्याने पिकाचे नुकसान होत आहे.

आंबा उत्पादन निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडले आहे. काही मोजक्याच बागायतदारांकडे आंबा असला तरी बहुतांश बागायदार मात्र, आंबा नसल्याने आर्थिक गणिते सुटणार कशी, या धास्तीत सापडली आहेत. थ्रीप्समुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा धोक्यात आला असून बागायतदार धास्तावले आहेत. याबाबत कृषी विभाग व शासकीय यंत्रणांकडून पंचनामे करून आंबा नुकसान जाहीर करण्याची मागणी जिल्ह्यातील बागायतदार व शेतकरी संघटनांद्वारे करण्यात आली आहे.

बागायतदारांची तक्रार

अधिकृत विक्रेत्यांकडील महागडी कीटकनाशके फवारणीसाठी वापरली जात आहेत; परंतु थ्रीप्स आटोक्यात येत नसल्याने कीटकनाशके भेसळ आहेत, दर्जेदार नसल्याने फुलकिडे नियंत्रणासाठी अपयशी ठरत आहेत, अशी तक्रार बागायदार करीत आहेत.

संशाेधन नाहीच

जिल्ह्यात कोकण कृषी विद्यापीठ आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे उद्भवणाऱ्या समस्या, कीडरोग याबाबत संशोधन होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Threat of thrips on mango, production threatened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.