आमदार भास्कर जाधव यांना ठार मारण्याच्या धमकी, समर्थक आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 12:10 PM2024-02-15T12:10:01+5:302024-02-15T12:10:32+5:30
चिपळूण : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना ठार मारण्याच्या धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि जाधव ...
चिपळूण : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना ठार मारण्याच्या धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि जाधव यांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. तसे निवेदन त्यांनी बुधवारी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही भास्कर जाधव समर्थक असून, त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत. शासनकर्ते सत्तेचा दुरुपयोग करून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर चुकीची कारवाई करत आहेत. त्याविरोधात आमदार जाधव लोकांमध्ये जनजागृती करीत आहेत. राज्यात, कोकणात अथवा जिल्ह्यात ते आक्रमक भूमिका मांडतात. त्याचवेळी सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची ते काळजी घेतात.
गेले काही दिवस केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे, माजी खासदार नीलेश राणे हे महाविकास आघाडीवर टीका करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नेते भास्कर जाधव यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत. या पार्श्वभूमीवर १६ फेब्रुवारी रोजी नीलेश राणे यांची आमदार जाधव यांच्या गुहागर मतदारसंघात शृंगारतळी येथे सभा होणार आहे. या मेळाव्याला माजी खासदार राणे येणार असल्याचे वृत्त आहे. तसेच जाधव यांच्या भ्रमणध्वनीवर अज्ञातांकडून धमक्यांचे फोन येत आहेत. जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, हे गंभीर आहे.
अशाप्रकारे सामाजिक शांतता बिघडविण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल, तर त्याला प्रतिबंध करणे, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित असते. त्यामुळे नीलेश राणे यांच्या शृंगारतळी येथे होणाऱ्या सभेला पोलिसांनी प्रतिबंध करावा, अशी मागणी आमदार जाधव समर्थकांनी केली आहे.
जाधव यांना येणाऱ्या धमक्या, होणारी चर्चा आणि झालेली विधाने लक्षात घेता त्यांचे निवासस्थान, कार्यालयाला सुरक्षा व्यवस्था देणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. ही सुरक्षा न मिळाल्यास आणि जाधव यांना कोणतीही इजा झाल्यास त्याची सर्व जबाबदारी पोलिसांवर राहील, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी फैसल कास्कर, माजी सभापती जितेंद्र चव्हाण, सुभाष कदम, बी. डी. शिंदे, नितीन निकम, संतोष चव्हाण, नाना महाडिक, प्रीतम वंजारी, हरी कासार, साहील शिर्के, गौरव पाटेकर, आल्हाद वरवाटकर, संतोष तांदळे उपस्थित होते.