Ratnagiri: दाऊदची मालमत्ता घेणारे भारद्वाज यांना धमक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 11:47 AM2024-03-28T11:47:08+5:302024-03-28T11:47:44+5:30
खेड (जि. रत्नागिरी ) : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची तालुक्यातील मुंबके येथील मालमत्ता सरकारी लिलावात घेतलेल्या दिल्ली स्थित ...
खेड (जि. रत्नागिरी) : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची तालुक्यातील मुंबके येथील मालमत्ता सरकारी लिलावात घेतलेल्या दिल्ली स्थित वकील भूपेंद्रकुमार भारद्वाज यांनी स्थानिकांकडून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार खेड पाेलिस ठाण्यात केली आहे. तसेच धार्मिक कार्यासाठी वापरलेल्या त्यांच्या साहित्याचीही चोरी झाल्याचेही नमूद केले आहे. या तक्रारीवरून २६ मार्च रोजी येथील पोलिस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर याची मुंबके या मूळ गावातील मालमत्ता दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील भूपेंद्रकुमार भारद्वाज यांनी लिलावात खरेदी केली होती. २३ फेब्रुवारी रोजी या मालमत्तेचे भारद्वाज यांच्या नावे हस्तांतरण झाले. दरम्यान, कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याच दिवशी मुंबके येथे जाऊन ॲड. भूपेंद्रकुमार भारद्वाज यांनी सनातन धर्मानुसार होमहवन करण्याचे नियोजन केले होते.
मात्र, त्यावेळी या कार्यासाठी रात्र झाल्यामुळे त्या वस्तू त्याच ठिकाणी ठेवल्या होत्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा होमहवन करण्यासाठी त्याठिकाणी सकाळी भारद्वाज गेले असता धार्मिक पुस्तके, पूजेचे साहित्य तसेच घरगुती वस्तू व सांस्कृतिक मालमत्ता चोरीला गेलेल्या दिसल्या. त्यामध्ये समई, हवन कुंड, स्टीलचे ताटे अशाप्रकारे नऊ हजार चारशे रुपये किमतीच्या वस्तू चोरीला गेल्याची तक्रार भूपेंद्रकुमार भारद्वाज यांनी खेड पोलिस स्थानकात दिली आहे.