तरुणाच्या खूनप्रकरणी काकासह तीन आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:32 AM2021-05-13T04:32:36+5:302021-05-13T04:32:36+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव बाईंगवाडी येथे मंगळवारी तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी केलेल्या धडक तपासात २४ ...
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव बाईंगवाडी येथे मंगळवारी तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी केलेल्या धडक तपासात २४ तासांत मृत तरुणाच्या काकासह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्या तिघांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव बाईंगवाडी येथील शेवरपऱ्याच्या पाण्यात राकेश सावंत (वय ३६, कोंडगाव) या तरुणाचा मृतदेह मंगळवारी सापडला. त्याच्या डोक्यात दगड मारुन त्याचा खून करण्यात आला होता. राकेशचा काका प्रवीण तुकाराम सावंत यांच्या घराच्या समोरील शेतातून राकेशला ओढत नेऊन शेवरपऱ्यात टाकण्यात आले होते.
या घटनेबाबत प्रवीण तुकाराम सावंत (५३, रा. कोंडगाव, बाईंगवाडी) यांनी अज्ञाताविरुध्द तक्रार दिली होती. ही माहिती प्राप्त होताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून देवरुख येथे जाऊन आरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा निवास साळोखे व देवरुखचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप हेही उपस्थित होते.
राकेशचा खून स्थानिक लोकांनीच केला असल्याचे घटनास्थळावरून लक्षात येत होते. त्यामुळे आजूबाजूला राहणारे तसेच त्याच्या नातेवाईकांकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली. यादरम्यान श्वानपथकही तेथे बोलावण्यात आले होते. या श्वानपथकाने संशयित आरोपीच्या दिशेने भुंकण्यास सुरुवात केली आणि पोलिसांचा संशय बळावला. नंतरच्या सखोल चौकशीमध्ये मृत राकेशचा चुलत भाऊ सुहास मोहन सावंत (३६), काका मोहन तुकाराम सावंत (७२) आणि तिसरा नातेवाईक भुपेश चंद्रकांत सावंत (३९, सर्व रा. कोंडगाव, बाईंगवाडी, ता. संगमेश्वर) यांनीच राकेशचा जीव घेत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना मंगळवारी रात्री रोजी अटक करण्यात आली.
बुधवारी तीनही संशयित आरोपींना देवरुख न्यायालयात हजर केले असता, त्यांना १७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. देवरुखचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप अधिक तपास करत आहेत. ही कामगिरी बजावणाऱ्या पथकात उपविभागीय पोलीस अधिकारी निवास साळोखे, मारुती जगताप, निरीक्षक हेमंतकुमार शहा, उपनिरीक्षक विकास चव्हाण, उपनिरीक्षक विद्या पाटील, सहायक पोलीस फौजदार संजय उकार्डे, पोलीस नाईक जितेंद्र कदम, सचिन भुजबळराव, संजय मारळकर, पोलीस नाईक संतोष सडकर, विश्वास बरगाळे, अर्पिता दुधाणे, सचिन पवार, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश भोसले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार मिलिंद कदम, अरुण चाळके, संजय कांबळे, संदीप कोळंबेकर, नितीन डोमणे, संजय जाधव, पोलीस नाईक अमोल भोसले, रमिज शेख यांचा समावेश होता.