Ratnagiri: संगमेश्वरात तीन महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा विनयभंग, संस्थाध्यक्षांसह तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 03:22 PM2024-10-01T15:22:02+5:302024-10-01T15:23:11+5:30
संस्थेच्या ग्रंथपाल महिलेने रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील एका महाविद्यालयातील तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा खळबळजनक प्रकार समाेर आला आहे. संगमेश्वर पोलिस स्थानकात संस्था अध्यक्ष, त्यांचा मुलगा आणि मुख्याध्यापकाविरुद्ध पाेक्साे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संस्था अध्यक्ष नयन मुळ्ये (६८), त्यांचा मुलगा प्रथमेश मुळ्ये आणि मुख्याध्यापक संजय मुळ्ये अशी गुन्हा दाखल केलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत संस्थेच्या ग्रंथपाल महिलेने रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार पीडित तीनही मुली गणपती सुटीत आपल्या गावी गेल्या नव्हत्या. त्यातील एक १७ वर्षीय पीडिता ही ग्रंथपाल महिलेकडे राहण्यासाठी गेली होती. त्यानंतर ग्रंथपाल महिला आपल्या गावी गेल्यानंतर ती पीडिता नयन मुळ्ये यांच्या घरी राहण्यासाठी गेलेली असताना संशयित नयन मुळ्ये याने तिचा विनयभंग केला आणि पीडितेला धमकावले.
याबाबत तिने मुख्याध्यापक संजय मुळ्ये यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर पीडितेने गणपती सुटीनंतर घडलेला सर्व प्रकार ग्रंथपाल महिलेला सांगितला. यानुसार पाेलिसांनी तिघांविराेधात पाेक्साे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच अन्य दोन पीडित मुलांचा विनयभंग कोठे करण्यात आला, याचा तपास संगमेश्वर पोलिस करत आहेत.