रत्नागिरीला तीन दिवसांचा ऑरेंज अलर्ट, आतापर्यंत ६६ टक्के पाऊस
By शोभना कांबळे | Published: August 1, 2023 06:28 PM2023-08-01T18:28:12+5:302023-08-01T18:38:01+5:30
रत्नागिरी : हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्ह्याला मंगळवारपासून तीन दिवसांचा पुन्हा आॅरेज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २०,१४३ मिलिमीटर ...
रत्नागिरी : हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्ह्याला मंगळवारपासून तीन दिवसांचा पुन्हा आॅरेज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २०,१४३ मिलिमीटर (सरासरी २२३८ मिलिमीटर) इतका पाऊस पडला आहे. गेल्या दोन महिन्यांची सरासरी पावसाने केवळ १५ दिवसांत ओलांडली आहे. आतापर्यंत ६६ टक्के पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ५७ टक्के पाऊस पडला होता.
जून महिन्याच्या शेवटी पावसाची सुरुवात झाली तरीही पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पाऊस जून आणि जुलैची सरासरी भरून काढेल का, अशी साशंकता निर्माण झाली होती. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पावसाची हुलकावणी होती. परंतु, गेल्या पंधरा दिवसांत मुसळधार पडलेल्या पावसाने जिल्ह्याला दिलासा दिला आहे.
सोमवारपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मधूनच उन्हाचे दर्शनही घडत आहे. मात्र, अधूनमधून जोरदार सरीही कोसळत आहेत. मंगळवारी सकाळी ८:३० वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ६३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दापोली, चिपळूण तालुक्यात १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. मंडणगड, गुहागर, लांजा, खेड येथेही पाऊस चांगला झाला आहे.
जिल्ह्याला मंगळवारपासून पुन्हा तीन दिवसांचा आॅरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दुपारपर्यंत पाऊस सरींवर होता. सायंकाळनंतर मात्र पावसाचा जोर अधिक वाढला.