रत्नागिरीतील वाटद धरणामध्ये तिघे बुडाले, एक मृत; कोल्हापूरचा तरुण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 11:38 AM2023-07-27T11:38:58+5:302023-07-27T11:39:30+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील वाटद बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेले तिघेजण बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. हे सर्वजण जेएसडब्ल्यू कंपनीतील कामगार ...
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील वाटद बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेले तिघेजण बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. हे सर्वजण जेएसडब्ल्यू कंपनीतील कामगार असल्याचे समजते. त्यातील एकजण बचावला असून, दुसऱ्याचा मृतदेह सापडला आहे. मूळचा कोल्हापूर येथील त्यांचा तिसरा सहकारी ओंकार जाधव (२३) मात्र सायंकाळी उशिरापर्यंत बेपत्ता होता.
मुसळधार पाऊस कोसळत असताना जेएसडब्ल्यू कंपनीतील विमिष नायर (३५, मूळ रा. गोवा, सध्या रा. वाटद खंडाळा), विक्रम नरेशचंद्र (३४, मूळ रा, उत्तरप्रदेश, सध्या वाटद खंडाळा) आणि ओंकार जाधव असे तिघेजण बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेले होते. २४ तासांहून अधिकवेळ सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे बंधाऱ्यात मोठा पाणीसाठा झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात हे तिघेजण बुडाले.
आरडाओरडा झाल्यास आसपासचे लोक तेथे गेले. यातील विमिष नायर याने स्वत:ला कसेबसे वाचवले. मात्र, विक्रम नरेशचंद्र स्वत:ला वाचवू शकला नाही. त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह आसपासच असल्याने तो हाती लागला. मात्र, ओंकार जाधव बेपत्ता झाला आहे. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. मात्र, तो सापडला नाही.