राजापुरात तीनजणांचा कोरोनाने मृत्यू, ६४ रुग्ण अॅक्टिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:50 AM2021-05-05T04:50:39+5:302021-05-05T04:50:39+5:30
राजापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राजापूर तालुक्यात ग्रामीण भागात हात-पाय पसरले असतानाच, राजापूर शहरातही दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढू ...
राजापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राजापूर तालुक्यात ग्रामीण भागात हात-पाय पसरले असतानाच, राजापूर शहरातही दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवारी राजापुरात एस.टी. बसस्थानक परिसरात गुरववाडी व बंगलवाडी येथे दोन जणांचा, तर यापूर्वी चव्हाणवाडी भागात एकाचा, असा तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच सध्या ६६ रुग्ण अॅक्टिव्ह असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
गुरववाडी भागातील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. तसेच हा भाग कंटेन्मेन्ट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. शहरात कोरोनाने तीन जणांचा झालेला मृत्यू आणि वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, शहरातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे व मुख्याधिकरी देवानंद ढेकळे यांनी केले आहे.
राजापूर शहरात चव्हाणवाडी परिसरातील एका कोरोनाबाधित रुग्णाचा यापूर्वीच मृत्यू झाला होता, तर रविवारी गुरववाडी येथील एकाचा व बंगलवाडी येथील एकाचा मृत्यू झाला आहे. गुरववाडी येथील व्यक्तीचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्यानंतर हा परिसर कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे.
तसेच बंगलवाडी येथील ज्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तो रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर रायपाटण कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू होते. उपचारानंतर घरी आल्यानंतर त्याचा रविवारी मृत्यू झाला आहे. या व्यक्तीसह त्याच्या कुटुंबातीलही व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यामुळे त्यांना ‘होम आयसोलेट’ करण्यात आल्याचे नगरपरिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत राजापूर शहरात ४ जानेवारी ते ३ मे या कालावधीत एकूण ८४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. यापैकी २० जण बरे झाले असून, ६४ रुग्ण अॅक्टिव्ह असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
एस.टी. बसस्थानक गुरववाडी परिसरात कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीने, या भागात झालेल्या एका लग्नसमारंभाला उपस्थिती लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे या भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. शहरात सर्वच प्रभागात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामध्ये शहर बाजारपेठ, झरीरोड, ओगलेवाडी, दिवटेवाडी, साखळकरवाडी, गुजराळी, भटाळी, आंबेवाडी, चव्हाणवाडी, यश अपार्टमेंट, बंगलवाडी, गुरववाडी या परिसरात कोरोना संसर्गाचे रुग्ण असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.