धामणी येथे अपघातात तीन ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:23 AM2018-04-30T00:23:47+5:302018-04-30T00:23:47+5:30
देवरुख : मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे ट्रक व स्कॉर्पिओ यांच्यात समोरासमोर धडक होऊन तीनजण ठार झाले. मृतांमध्ये राजापूर काजिर्डा येथील दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे.
या अपघातात दोन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यातील एका महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य एका महिलेवर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला.
संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पवार कुटुंबीय हे स्कॉर्पिओ गाडीतून (एमएच-०४, ईक्यू- ६५०८) मुंबईहून पाचल (ता. राजापूर)कडे येत होते, तर राजेंद्र्र सावंत हे आपल्या ताब्यातील ट्रकमध्ये (एमएच-०८, डब्ल्यू-१४१४) रद्दी भरून गोव्याहून चिपळूणकडे जात होते. ट्रक व स्कॉर्पिओ धामणी येथे आली असता दोन्ही चालकांचे नियंत्रण सुटल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. वाहने भरधाव वेगात असल्याने धडक होताच दोन्ही वाहने रस्त्याच्या दुतर्फा फेकली गेली. राजेंद्र्र तानाजी सावंत यांनी या अपघाताची माहिती दिली.
या अपघातात स्कॉर्पिओ गाडीचा चक्काचूर झाला आहे. रवींद्र्र व अनिल हे दोन सख्खे भाऊ जागीच गतप्राण झाले. अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या अपर्णा पवार व रसिका पवार यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रसिका यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अपर्णा यांच्या छातीला मार लागला असून उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश थिटे, पोलीस उपनिरीक्षक एस. एस. झगडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला.