मुंबई-गोवा महामार्गावर टायर फुटून गाडी नदीत, तिघे बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 02:30 PM2018-06-27T14:30:05+5:302018-06-27T17:12:04+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर टायर फुटून इनोव्हा कार नदीत पडल्याने तीनजण बेपत्ता झाल्याची दुर्घटना संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे आज बुधवारी दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या गाडीतून चिपळूण तालुक्यातील धामणंद येथील पाटणे कुटुंबीय प्रवास करत होते. हे सर्वजण लांजाहून चिपळूणच्या दिशेने जात होते. बेपत्ता चारजणांमध्ये १२ वर्षाच्या एका मुलाचाही समावेश आहे.
सचिन मोहिते
देवरूख : मुंबई-गोवा महामार्गावर टायर फुटून इनोव्हा कार नदीत पडल्याने तीनजण बेपत्ता झाल्याची दुर्घटना संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे आज बुधवारी दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
या गाडीतून चिपळूण तालुक्यातील धामणंद येथील पाटणे कुटुंबीय प्रवास करत होते. हे सर्वजण लांजाहून चिपळूणच्या दिशेने जात होते. बेपत्ता चारजणांमध्ये १२ वर्षाच्या एका मुलाचाही समावेश आहे.
पाटणे कुटुंबातील बारा वर्षाचा मुलगा चिंटू पाटणे, त्याची आई प्रगती (४0) आणि त्याची आजी प्रभावती (६0) असे हे कुटुंब चालक घेऊन एका बारशासाठी लांजा येथे गेले होते. सकाळी ९ ते ९.३0 च्या सुमारास ते लांजाहून आपल्या गावी जाण्यासाठी निघाले. मात्र धामणी येथे कारचा टायर फुटला आणि गाडी महामार्गावरून थेट नदीत पडली.
गेले काही दिवस मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी वाढले आहे. त्यामुळे ही गाडी बुडाली. या गाडीचा चालक गाडीतून बाहेर फेकला गेला. त्याला एका झुडुपाचा आधार मिळाला. काही वेळ तो त्या झुडुपावरच लटकून होता. त्यामुळेच त्याचा जीव वाचला. आसपासच्या लोकांनी त्याला बाहेर काढले आहे. उर्वरित तिघेजण बेपत्ता आहेत.
शोधकार्य सुरु असून देवरुखच्या राजू काकडे हेल्प अकॅडमीला पाचारण केले आहे. संगमेश्वर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्यासाठी मदत करत आहेत, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील यांनी दिली आहे.