तीन महिने अगोदरच मूर्तिशाळांमध्ये बाप्पांच्या मूर्ती आकाराला...
By admin | Published: June 16, 2015 11:22 PM2015-06-16T23:22:59+5:302015-06-17T00:38:14+5:30
पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिने प्लास्टर आॅफ पॅरिसच्या वापरास मज्जाव करण्यात येत असला तरी मोठ्या मूर्तींसाठी सर्रास वापर सुरू आहे.
रत्नागिरी : आजपासून बरोब्बर तीन महिने... तीन महिन्यांनी बाप्पांचं आगमन होणार. पण तीन महिने अगोदरच बाप्पांच्या मूर्ती चित्रशाळांमध्ये आकार घेऊ लागल्या आहेत.वर्षभर ज्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करावी लागते, त्या बाप्पांचे आगमन यावर्षी अधिक मासामुळे लांबले आहे. आषाढ अधिक मास असल्यामुळे गणेश चतुर्थीचा सण १७ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सवास अजून तीन महिने शिल्लक असले तरी मूर्तिशाळेमध्ये मात्र कामाची लगबग सुरू झाली आहे.
महागाईने उच्चांक निर्माण केला आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च वाढतो, परिणामी मजूरी, रंग, मातीचे दर वधारल्याने यावर्षी मूर्तींच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घरोघरी गणेशमूर्ती आणून भक्तिभावाने त्या पूजल्या जातात. यावर्षी गणेशोत्सव १७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे गणेशमूर्ती तयार करणाऱ्या चित्रशाळेत कामाची लगबग सुरू झाली आहे. बहुतांश मूर्तिकार अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर माती भिजवून कामाचा शुभारंभ करतात. प्रामुख्याने शाडूच्या मूर्ती तयार केल्या जातात. शाडूची माती गुजरात येथील भावनगर येथून मागवली जाते. भावनगरहून पेण येथे अधिकतम माती आयात केली जाते. तेथून महाराष्ट्रभर मातीचे वितरण केले जाते. इंधनाच्या वाढत्या दरामुळे वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे २०० ते २२५ रूपयांना मिळणारे शाडू मातीचे पोते यावर्षी २५० ते २७५ रूपये दराने विकण्यात येत आहे. भिजवलेल्या मातीचा गोळा साच्यात ठेवून त्याला सुंदर गणेश मूर्तीचा आकार दिला जातो. मूर्तीवरील कोरीव काम, सुबक रंगकाम करण्यासाठी कुशल कारागिरांची आवश्यकता आहे. ग्रामीण भागात सध्या संबंधित कारागिरांची उणीव भासू लागली आहे. पावसाळा सुरू असल्याने वातावरणात आर्द्रता असते. परिणामी मूर्ती वाळण्यास वेळ लागतो. शेतीची कामे सुरू असल्याने मजूर नियमित येत नाहीत. तसेच रंगाच्या दरातही वाढ झालेली दिसून येत आहे. यामुळे बाप्पांच्या मूर्तीच्या दरावर परिणाम होणार आहे.मुंबईतला गणेशोत्सव भक्तांना भुरळ घालतो. त्या ठिकाणी विविध आकारातील, रूपातील आकर्षक मूर्ती पाहायला मिळतात. त्यामुळे फोटोच्या स्वरूपात किंवा व्हाटस्अप, मोबाईलव्दारे फोटो पाठवून मूर्ती तयार करण्यास सांगण्यात येते. इंटरनेटवरील सोशल साईट्सव्दारे कार्टून्सपासून पौराणिक कथेतील अर्जुन, परशुराम, महादेव, बालगणेश, हनुमान रूपातील गणेशमूर्ती तयार करण्याची गळ मूर्तिकाराला घातली जाते. सव्वा इंचापासून साडेतीन चार फुटी गणेशमूर्ती भक्त तयार करून घेतात. सार्वजनिक गणेशमूर्ती चार ते बारा फुटी असतात. मुंबई, पुणेसारख्या शहरात मोठमोठ्या गणेशमूर्ती तयार करण्यासाठी मंडळांमध्ये चुरस लागलेली असते. बहुतेक मोठ्या मूर्ती जागेवरच तयार केल्या जातात, जेणेकरून हलवताना त्याचा त्रास होत नाही. तसेच मोठ्या मूर्ती मातीऐवजी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या तयार करण्यात येतात. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिने प्लास्टर आॅफ पॅरिसच्या वापरास मज्जाव करण्यात येत असला तरी मोठ्या मूर्तींसाठी सर्रास वापर सुरू आहे. शाडूची माती महाग पडत असल्याने काही मूर्तिकारांनी लाल चिकटमातीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)
लाल मातीपेक्षा शाडूची मूर्ती पाण्यात लवकर विरघळते. मात्र, त्यामुळे कोणतेही प्रदूषण होत नसल्यामुळे तीन - चार वर्षांत लाल मातीपासून गणपती तयार करण्यात येत आहेत. लाल मातीतील कठीण गुणधर्मामुळे मूर्ती चांगली बनते. बहुतांश गणपती मूर्ती लाल मातीव्दारे बनवण्यात येत आहेत. अन्य काही कारखानदारही लाल मातीचा वापर करू लागले आहेत.
- सुशील कोतवडेकर, मूर्तिकार, नाचणे, रत्नागिरी.