तीन महिन्यांनंतर ती निघाली मुलासोबत तिच्या हरयाणातील घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:23 AM2021-06-06T04:23:24+5:302021-06-06T04:23:24+5:30
रत्नागिरी : येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात राहून तीन महिन्यांच्या उपचाराने सुधारलेल्या सरलादेवीला हरयाणातून तिचा मुलगा न्यायला आल्याने शनिवारी सकाळी तिला ...
रत्नागिरी : येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात राहून तीन महिन्यांच्या उपचाराने सुधारलेल्या सरलादेवीला हरयाणातून तिचा मुलगा न्यायला आल्याने शनिवारी सकाळी तिला मनोरुग्णालयाने प्रेमाने तिच्या घरी पाठवणी केली.
काही दिवसांपूर्वी जयगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांना एक मनोरुग्ण महिला सापडली. ती खंडाळा येथे एकटीच भटकंती करत होती. लोकांवर दगडफेक करत जे काही मिळेल ते खात होती. ढेरे यांनी मानवतेच्या भावनेने तिची विचारपूस केली. रत्नागिरीतील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या राजरत्न प्रतिष्ठानच्या सचिन शिंदे यांच्याकडे तातडीने संपर्क केला. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा अवघड काळ सुरू असतानाही राजरत्नच्या टीमने तिला स्वच्छ करून मनोरुग्णालयात दाखल केले.
मनोरुग्णालयात दाखल करताच डॉक्टर आणि सर्व कर्मचाऱ्यांनी तिच्यावर उपचार सुरू केले. तिची प्रेमाने देखभाल केली. तीन महिन्यांतच ती पूर्ण बरी झाली, अगदी पहिली होती तशी. तिचे नाव सरलादेवी होते. त्यानंतर तिला तिच्या घरी परतण्याचे वेध लागले. तिचा पत्ता शोधणे, तिचे नातेवाईक शोधणे, घर शोधणे भाषेमुळे आव्हान होते. मात्र, मनोरुग्णालयातील सोशल वर्कर नितीन शिवदे यांनी हे अवघड काम परिश्रमाने केले आणि अखेर तिच्या नातेवाइकांचा शोध लावला. यात हरयाणा पोलीस देवेंद्र राठी यांची भूमिकाही महत्त्वाची होती.
अखेर तिचा मुलगा दीपक आपल्या आईला न्यायला रत्नागिरीत आला. मुलाला पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. शनिवारी सकाळी मनोरुग्णालयातून हरयाणा येथे तिच्या हक्काच्या घरी तिची पाठवणी करण्यात आली. यावेळी मनोरुग्णालयाचे कर्मचारी आणि राजरत्न प्रतिष्ठानची टीम उपस्थित होती. मानसिक रुग्ण बरे होतात, त्यासाठी त्यांना हवे असतात आपुलकीचे दोन शब्द, हेच या घटनेेने दाखवून दिले. सरलादेवीला तिचे घर मिळवून देण्यात जयगडचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, मनोरुग्णालयाचे सोशल वर्कर नितीन शिवदे, राजरत्न प्रतिष्ठानचे सचिन शिंदे, ऐश्वर्या गावकर, जया डावर, तन्मय सावंत, मयुरेश मडके, सिद्धेश धुळप, आदिती मुळ्ये, सौरभ मुळ्ये आणि प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.