Ratnagiri Crime: खवल्यांच्या तस्करीप्रकरणी आणखी तिघे ताब्यात
By संदीप बांद्रे | Published: June 30, 2023 07:21 PM2023-06-30T19:21:06+5:302023-06-30T19:22:57+5:30
तब्बल दोन वर्षांपूर्वी शिकार केलेल्या खवले मांजराच्या खवल्यांची विक्री होत असताना वनविभागाने शिताफीने सर्व आरोपींना घेतले ताब्यात
चिपळूण/खेड : तालुक्यातील लोटे येथे २५ रोजी खवले मांजराच्या खवल्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना दापोली व चिपळूण वन परिक्षेत्रातील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणी आणखी तिघांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. तब्बल दोन वर्षांपूर्वी शिकार केलेल्या खवले मांजराच्या खवल्यांची विक्री होत असताना, वनविभागाने शिताफीने सर्व आरोपींना अवघ्या चार दिवसांत ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील लोटे येथे रविवारी (२५ जून) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास महामार्गावर दोन संशयित व्यक्ती आढळल्या. अधिक चौकशी केली असता, या दोन व्यक्तींच्या बॅगेमध्ये विक्रीसाठी आणलेली खवले मांजराचे खवले आढळले हाेते. वनविभागाने मिलिंद वसंत सावंत (५५ रा.मालाड, मुंबई) व मीना मोहन कोटिया (६२, रा.लोटे, खेड) या दोघांकडून ०.९३० किलोग्रॅम खवले जप्त करून, दाेघांना ताब्यात घेतले हाेते.
या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, २८ रोजी मुंबईतील मुंब्रा येथून राजाराम पगारे (६८, रा.मुंब्रा, मुंबई) याला वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, ३० जूनपर्यंत वनविभागाच्या कोठडीत त्याची रवानगी केली होती, तर या प्रकरणी २९ रोजी सायंकाळी ५ ते ६ या कालावधीत तालुक्यातील बिजघर येथून योगेश युवराज निकम (२७, रा.बिजघर कातकरीवाडी, खेड) व श्रीकांत तानाजीराव भोसले (५७, रा.बिजघर मावळतवाडी, खेड) यांना वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
या कारवाईत फिरते पथक रत्नागिरीचे परिक्षेत्र वन अधिकारी वैभव बोराटे, परिक्षेत्र वन अधिकारी चिपळूण राजश्री किर, वनपाल खेड सुरशे उपरे, वनपाल दापोली साताप्पा सावंत, वनपाल सावर्डे उमेश आखाडे, वनरक्षक शुभांगी गुरव, अशोक ढाकणे, अश्विनी जाधव, कृष्णा इरमले यांनी सहभाग घेतला हाेता.