रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील आंगले, बाकाळेत आणखी तीन कातळशिल्पे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 01:15 PM2018-03-23T13:15:39+5:302018-03-23T13:15:39+5:30
कातळशिल्पाचे नंदनवन म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या राजापूर तालुक्यातील आंगले, बाकाळे व रानतळे परिसरात आणखी तीन नवीन कातळशिल्पे सापडली आहेत. त्यामध्ये दोन ठिकाणी मानवाकृती तर एका ठिकाणी एकशिंगी गेंडा अशा स्वरुपाची शिल्पे आहेत. दरम्यान, कातळशिल्पांचे शोधक धनंजय मराठे व सुधीर रिसबुड यांनी आंगले येथील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहाय्याने गावात सापडलेल्या कातळशिल्पांची साफसफाई केली.
राजापूर : कातळशिल्पाचे नंदनवन म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या राजापूर तालुक्यातील आंगले, बाकाळे व रानतळे परिसरात आणखी तीन नवीन कातळशिल्पे सापडली आहेत. त्यामध्ये दोन ठिकाणी मानवाकृती तर एका ठिकाणी एकशिंगी गेंडा अशा स्वरुपाची शिल्पे आहेत. दरम्यान, कातळशिल्पांचे शोधक धनंजय मराठे व सुधीर रिसबुड यांनी आंगले येथील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहाय्याने गावात सापडलेल्या कातळशिल्पांची साफसफाई केली.
कोकण पर्यटनाच्या नकाशावर वेगाने झेपावणाऱ्या कातळशिल्प या कलेची दखल घेणाऱ्या राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात कातळशिल्पांचे संरक्षण, जतन व संवर्धन करण्याचा निर्णय घेताना चोवीस कोटी निधीची प्रथमच तरतूद केली होती. त्यामुळे कातळशिल्प या कलेचे महत्त्व गडद झाले आहे . कोकण पर्यटनाचा विचार करता कातळशिल्पांमुळे पर्यटन व्यवसायाला चांगले दिवस येऊ लागले आहेत.
कोकणात विविध ठिकाणी मागील काही वर्षात कातळशिल्पे सापडली आहेत. त्यामध्ये राजापूर तालुका आघाडीवर आहे. तालुक्यातील अनेक गावात कातळशिल्पे यापूर्वी सापडली होती. त्याचे शोधन धनंजय मराठे व सुधीर रिसबुड यांच्या प्रयत्नाने झाले होते. तालुक्याच्या विविध भागात आणखी कातळशिल्पे सापडतील, अशी शक्यता दाट बनल्याने धनंजय मराठे व सुधीर रिसबुड यांनी आपली शोधमोहीम अजूनही चालूच ठेवली आहे.
त्यांना तालुक्यातील बाकाळे, आंगले व रानतळे याठिकाणी कातळशिल्पे असल्याची माहिती मिळाली व त्यानंतर त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन खातरजमा केली. त्यावेळी तीनही ठिकाणी प्रत्येकी एकेक कातळशिल्प आढळून आले. त्यामध्ये बाकाळे येथील मंदार परांजपे यांनी दिलेल्या माहितीवरुन तेथे मानावाकृती कातळशिल्प आढळले.
रानतळे येथे एकशिंगी गेंडा शिल्प सापडले असून, ते नऊ फूट लांब तर आठ फूट रुंद आहे. आंगले येथील कातळशिल्प हे शशिकांत काकिर्डे यांच्या जागेत असून, ते मानवाकृती चौकोनी स्वरुपाचे आहे. त्याची लांबी व रुंदी ही सतरा फूट असल्याची माहिती धनंजय मराठे यांनी दिली. आंगले शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी या कातळशिल्पांची साफसफाई केली.
कातळशिल्पांमुळे कोकणचे नाव उज्वल व्हावे
कोकण पर्यटनाच्या माध्यमातून येथील कातळशिल्पांचे जतन करणे, त्यांचे संवर्धन करुन पर्यटनवाढीला प्रोत्साहन मिळावे हा आमचा उद्देश आहे. ही कातळशिल्पे कोकणच्या वैभवात अधिक भर घालण्याचे काम करतील. जगाच्या नकाशावर कातळशिल्पांमुळे कोकणचे नाव उज्ज्वल व्हावे, यासाठी या शिल्पांच्या संवर्धनासाठी आपण कटीबध्द आहोत.
धनंजय मराठे
कातळशिल्प शोधक, राजापूर