जंगली डुकराने केलेल्या हल्ल्यात दापोली तालुक्यातील चांदीवणे येथे ३ जखमी, प्रकृती गंभीर असल्याने रुग्णालयात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 04:04 PM2017-12-15T16:04:41+5:302017-12-15T16:11:58+5:30
जंगली डुकराने केलेल्या हल्ल्यात दापोली तालुक्यातील चांदीवणे येथे कवळ तोडण्यासाठी गेलेले तीनजण जखमी झाले असून, त्यातील दोघांना दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी एकाला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.सहदेव वामने यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दापोली : जंगली डुकराने केलेल्या हल्ल्यात दापोली तालुक्यातील चांदीवणे येथे कवळ तोडण्यासाठी गेलेले तीनजण जखमी झाले असून, त्यातील दोघांना दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी एकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चांदीवणेचे पोलीसपाटील जितेंद्र करमरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास चांदीवणे खालचीवाडी परिसरात हरिश्चंद्र किसन तळवटकर (४०), सहदेव दौलत वामने (८०) व त्यांची पत्नी अनुसया वामने (७०) हे तिघे कवळ तोडायला गेले होते.
हरिश्चंद्र तळवटकर एका ठिकाणी कवळ तोडत होते, तर काही अंतरावर सहदेव वामने कवळ तोडत होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कवळ तोडून झाल्यावर त्यांनी कवळ जमा करावयास सुरुवात केली असता एका जंगली डुकराने प्रथम हरिश्चंद्र यांच्यावर हल्ला केला.
हरिश्चंद्र यांनी समयसूचकता दाखवत ते जवळच्या झाडावर चढले. त्यानंतर डुकराने आपला मोर्चा अनुसया यांच्याकडे वळवला व त्यांच्यावर हल्ला केला. अनुसया यांच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यानंतर अनुसयाही जीव वाचवण्यासाठी जवळच्या एका झाडावर चढल्या. त्यानंतर सहदेव वामने हे कोयती घेऊन डुकराच्या दिशेने धावून गेले. मात्र, डुकराने त्यांच्यावरही हल्ला केला व त्यांचे दोन्ही पाय फाडून टाकले.
या सर्वांची आरडाओरड ऐकून नदीवर असलेल्या गावकऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर या तिघांना दापोली रुग्णालयात आणले. सहदेव वामने यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.