बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 02:41 PM2018-12-11T14:41:46+5:302018-12-11T14:51:22+5:30
औद्योगिक कंपनीच्या कुंपणावर बसलेला बिबट्या पकडण्यासाठी मदत करणाऱ्या तीन ग्रामस्थांवर बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार खेड तालुक्यातील गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीत घडला.
शिरगाव (रत्नागिरी) - एका औद्योगिक कंपनीच्या कुंपणावर बसलेला बिबट्या पकडण्यासाठी मदत करणाऱ्या तीन ग्रामस्थांवर बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार खेड तालुक्यातील गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीत घडला. तिन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या गाणे खडपोलीतील साफयिस्ट कंपनीच्या कुंपणाच्या कठड्यावर बसलेला काही कर्मचाऱ्यांना दिसला. लगेचच हा विषय सगळीकडे पसरला आणि बघ्यांची गर्दी जमली.
बिबट्या फासकीतून सुटला असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे तो जखमी झाला आहे. या प्रकाराची माहिती तातडीने वनविभाला देण्यात आली. वन अधिकारी पत्की व त्यांचे दोन सहकारी घटनास्थळी आले. बिबट्या काही हालचाल न करता शांत बसून होता. मात्र वन खात्याचे लोक त्याला पकडण्यासाठी गेले. त्यांच्यासोबत चार ग्रामस्थ होते. एकजण पिंजरा सांभाळत होता. तेव्हा अचानक बिबट्याने झेप घेऊन तीन ग्रामस्थांना जखमी केले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. पिंजरा सांभाळणारा माणूस घाबरुन स्वतःच पिंजऱ्यात बसला. अखेर पिंजरा बाजूला आणून त्याला बाहेर काढण्यात आले.