निवसरमध्ये विहिरीत गुदमरून तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 11:28 PM2019-06-02T23:28:25+5:302019-06-02T23:28:31+5:30
लांजा : खोल विहिरीची साफसफाई करीत असताना श्वास गुदमरून तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना लांजा तालुक्यातील निवसर येथे ...
लांजा : खोल विहिरीची साफसफाई करीत असताना श्वास गुदमरून तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना लांजा तालुक्यातील निवसर येथे रविवारी सायंकाळी घडली.
उन्हाळ्यामुळे बहुतांशी विहिरींनी तळ गाठला आहे. विहिरीत पाणीच नसल्याने विहिरीतील गाळ व कचरा काढण्याचे काम हाती घेण्यात येते. निवसर वरचीवाडी येथील एका बागेतील १८ फूट खोल विहिरीत असलेला गाळ व साफसफाई करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. निवसर सोनारवाडी येथील विजय श्रीपाद सागवेकर (वय ४४) व नंदकुमार सीताराम सागवेकर (४४) यांच्यासमवेत पालीजवळील बांबर येथील अनिल गोविंद सागवेकर (२८) हे कामासाठी सकाळी आले होते. दुपारी जेवण आटोपून त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली.
दरम्यान, सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास या कामगारांची कोणतीच हालचाल होत नसल्याचे विहिरीच्या वर असणाऱ्या कामगारांच्या लक्षात आले. या तिन्ही कामगारांचा विहिरीत गुदमरून मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत निवसरचे पोलीस पाटील दत्ताराम मेस्त्री यांना माहिती दिली. त्यांनी लांजा पोलीसांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. तातडीने लांजा पोलीस उपनिरीक्षक पी. व्ही. पाटील, चेतन उत्तेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.