रत्नागिरीत तीन दुकाने भीषण आगीत भस्मसात
By admin | Published: February 12, 2017 11:28 PM2017-02-12T23:28:18+5:302017-02-12T23:28:18+5:30
पंधरा लाखांचे नुकसान; शॉर्टसर्किटने दुर्घटना
रत्नागिरी : शहरातील मारुतीआळी परिसरात शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या भीषण आगीत तीन दुकाने जळून खाक झाल्याची घटना मध्यरात्री १२.१५च्या सुमारास घडली. या आगीत तिन्ही दुकानांचे मिळून सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. या घटनेची नोंद शहर पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.
मुस्तफा महमद शफी ईब्जी (३३, कोकणनगर, रत्नागिरी) यांचे मारुती आळी परिसरात ‘हमेरा कलेक्शन’ नावाचे दुकान आहे. या दुकानाला लागूनच ‘वेलकम फुटवेअर’ व ‘स्टार जनरल स्टोअर्स’ ही दुकाने आहेत. मुस्तफा शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी निघून गेले. मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास दुकानात शॉर्टसर्किट झाले. मुस्तफा यांचे कपड्याचे दुकान असल्याने आतील कपड्यांनी पेट घेण्यास सुरुवात केली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. त्यामध्ये ‘हमेरा कलेक्शन’ हे दुकान जळून खाक झाले.
या आगीचे रूप इतके भीषण होते की, आगीने बाजूच्या दुकानांना वेढा दिला. त्यामुळे बाजूला असलेल्या वेलकम फुटवेअर व स्टार जनरल स्टोअर्स या दुकानांनीही पेट घेतला. ही दुकाने जळून खाक झाली. या आगीत तिन्ही दुकानांचे सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले. आग लागल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच आजूबाजूच्या नागरिकांनी मदतीचा हात देत ती विझविण्याचाप्रयत्न केला. परंतु तो अपयशी ठरला.
मारुती आळी परिसरात आग लागल्याची माहिती समजताच शहर पोलिस निरीक्षक इंद्रजित काटकर यांनी सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेत फिनोलेक्स व नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. तब्बल दोन तासानंतर ही आग आटोक्यात आली. यावेळी फायरमन संतोष गझने, मोहन कदम, यशवंत शेलार, जोगेंद्र जाधव, प्रकाश गझने, भगवान बेंद्रे व किशोर ढेपसे या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. (वार्ताहर)