तीनपदरी मार्गाचे उपविभागीय कार्यालय चिपळुणात
By admin | Published: July 16, 2017 06:08 PM2017-07-16T18:08:24+5:302017-07-16T18:08:24+5:30
कार्यकारी अभियंत्यांनी दिली माहिती
आॅनलाईन लोकमत
चिपळूण (जि. रत्नागिरी), दि. १५ : गुहागर - विजापूर या तीनपदरी मार्गाचे उपविभागीय कार्यालय चिपळूण येथे होणार असल्याचे कार्यकारी अभियंता बामणे यांनी दिल्याची माहिती माजी सभापती व राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिली.
गुहागर - विजापूर मार्गाबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी व विविध अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी माजी सभापती मुकादम यांनी कळंबस्तेचे उपसरपंच विवेक महाडिक, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर पालांडे, दशरथ जाधव, विकास जोडवेकर आदींच्या शिष्टमंडळासह कार्यकारी अभियंता बामणे यांची कोल्हापूर येथे भेट घेतली.
गुहागर - विजापूर मार्गाबाबतचे मुख्य कार्यालय कोल्हापूर येथे आहे. त्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्यास या भागातील जनतेला कोल्हापूर येथे हेलपाटे मारावे लागतील. यामुळे वेळ व पैशाचा अपव्यय होणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम सुरु असताना चिपळूण येथे उपविभागीय कार्यालय करावे, अशी मागणी मुकादम यांनी केली. यावेळी ही मागणी मान्य करताना गुहागर - विजापूर या तीनपदरी मार्गाचे काम महिनाभरात सुरु होणार असल्याचे बामणे यांनी सांगितले.
गुहागर - विजापूर मार्गासाठी २७२ कोटींचा निधी खर्च होणार असून, या रस्त्याची तीन ठेकेदारांना वर्कआॅर्डर देण्यात आली आहे. चिपळुणातील गुहागर नाका ते भाजीमंडईच्या मागच्या बाजूने हा रस्ता काढण्यात येणार असून, शीव नदीवरील पूलही नव्याने बांधण्यात येणार आहे. या रस्त्याची रुंदी १० मीटर राहणार असून, त्याला साईडपट्टी राहणार आहे. खेर्डी बाजारपेठेत या रस्त्याचे रुंदीकरण होणार नसून, घाटामध्येही केवळ अवघड वळणे रुंद करण्यात येणार आहेत. गणपतीनंतर या कामाचे जिल्ह्याच्या ठिकाणी भूमिपूजन होणार आहे. त्यामुळे गुहागर - विजापूर हा मार्ग चिपळूण बाजारपेठेतून जाणार हे आता निश्चित झाले आहे. माजी सभापती मुकादम यांनी या रस्त्याच्या कामाबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता.