मंडणगडात आपत्ती व्यवस्थापनाचे तीनतेरा
By admin | Published: June 8, 2015 10:27 PM2015-06-08T22:27:15+5:302015-06-09T01:00:11+5:30
असंख्य त्रुटी : भिंगळोलीतील महावितरण उपकेंद्राचा दूरध्वनी बंदच
मंडणगड : पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आपत्तीचा सामना करता यावा, यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचा दावा प्रशासन करीत आहे. त्यासाठी बीएसएनल व महावितरणसह अनेक सर्वच खात्यांनी मे महिना तयारीच्या पूर्वनियोजनासाठी घालविला आहे. मात्र, महावितरण कंपनीच्या भिंगळोली येथील सबस्टेशनचा दूरध्वनी गेली पंधरा दिवस बंद असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे आपत्तीच्या वेळी संपर्क साधायचा झाल्यास दूरध्वनी बंद असल्याने गैरसोय होणार आहे. दोन दिवसांपूर्वी विजेच्या कडकडाटसह मान्सूनने ठिकठिकाणी हजेरी लावली. तालुक्यातील पालघर येथील डी. पी.वर सुमारे अर्धा तास स्पार्किंग सुरु होते. यावेळी ग्रामस्थांनी सबस्टेशनवर फोन केला असता फोन बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. पावसाच्या दिवसात तारा तुटणे व स्पार्किंगसारख्या घटना वारंवार घडत असतात. काही वेळा अपघातही होतात. त्यासाठी महावितरणचे स्थानिक व्यवस्थापन नेहमीच सज्ज असते. पावसाळ्यात आपत्ती उद्भवू नये, यासाठी प्रयत्न केले जातात.
अजूनही पावसाने हजेरी लावली नसल्याने महावितरणच्या सज्जतेची अद्याप परीक्षा झालेली नाही. ओ. एफ़ सी. केबलद्वारे ग्रामपंचायती इंटनेटनच्या माध्यमातून जगाशी जोडण्याच्या नादात बीएसएनएल कंपनीची दमछाक होत आहे. या योजनेची रत्नागिरी जिल्ह्यात सर्वांत पहिली अंमलबजावणी मंडणगड तालुक्यात झाली, ही अभिमानास्पाद बाब असली तरी काम पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागातील एकेरी रस्त्यांच्या बाजूने ठिकठिकाणी खोदकाम झाल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. गेल्या पंधरा दिवसात लँडलाईन व मोबाईल अनेक वेळा दीर्घ कालावाधीसाठी संपर्कक्षेत्राबाहेर जातात. आपत्तीसाठी सज्ज असल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाच्या कसोटीचा काळ पावसानंतर सुरु होणार आहे. सध्या तरी नागरिकांना विविध कारणांनी समस्यांचा सामना करावा लागत असल्याने नाराजीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)
मंडणगड तालुक्यात अपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले.प्रसासकीय यंत्रणा सज्ज असल्याचा दावा करण्यात येत असला तरीही यंत्रणा सज्जतेबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे. पाऊस काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच संपर्काचे प्रमुख साधन असलेले बीएसएनएल मात्र संदीग्ध वातावरणातच आहे. त्या कारभारात सुधारणा कधी होणार .