रेल्वेच्या मोफत ‘वाय-फाय’चे तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 11:44 PM2017-08-09T23:44:13+5:302017-08-09T23:44:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते अडीच महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या रेल्वे स्थानकांवरील वायफाय सुविधेचा अनेक ठिकाणी बोजवारा उडाला आहे. लवकरच गणेशोत्सवाची गर्दी सुरू होणार असताना रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावंतवाडीसह अनेक स्थानकांवरील वायफाय सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत कोकण रेल्वे मार्गावर २८ स्थानकांवर मोफत वायफाय सेवा देण्याच्या उपक्रमास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली होती. प्रवाशांना, पर्यटकांना या सेवेचा लाभ मिळावा म्हणून रेल्वे मंत्रालयाने कोलाडपासून ते मडुरेपर्यंत २८ रेल्वे स्थानकांवर सिस्कॉन व जॉयस्टर या कंपन्यांकडून ‘जॉयस्पॉट’ ही वायफाय सेवा घेतली आहे. या सेवेचे रिसिव्हर बसविल्यानंतर सर्व २८ रेल्वे स्थानकांवरील २४ तास मोफत वायफाय सेवा उपक्रमाचे प्रातिनिधिक उदघाटन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २१ मे २0१७ रोजी कुडाळ स्थानकावर केले होते.
कोकण रेल्वे मार्गावर कोलाड, माणगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, खेड, अंजनी, चिपळुण, कामथे, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर, उक्षी, भोके, रत्नागिरी, निवसर, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड व मडुरे या स्थानकांवर मोफत वायफाय सेवा उपक्रमाची सुरुवात २१ मेपासून करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत होते. केंद्रात कोकणातील सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांच्या काळात कोकण रेल्वेला चांगले दिवस आले आहेत. कोकण रेल्वेमार्गावर प्रवाशांना अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थानकांवरील २४ तास मोफत वायफाय सेवा ही त्यातीलच एक महत्वाची सुविधा मानली जात आहे. मात्र काही महत्वाच्या स्थानकांवर ही सेवा महिनाभरापासून तर काही ठिकाणी गेल्या १५ दिवसांपासून बंद असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
काही स्थानकांवर चांगली सेवा
चिपळुण, खेड, कणकवली, कुडाळ या रेल्वे स्थानकांवरील जॉयस्पॉट वायफाय सेवा मात्र चांगल्या प्रकारे सुरू असल्याचेही प्रवाशांकडून सांगण्यात आले. अन्य स्थानकांवरही ही सेवा चांगल्या प्रकारे मिळावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. अशी चांगली सेवा मिळाल्यास रेल्वेतून प्रवास करताना कोणत्याही स्थानकावरून नातेवाईकांशी संपर्क साधणे प्रवाशांना शक्य होणार आहे. सध्या मार्गावरील अनेक ठिकाणी कोणत्याही मोबाईल कंपनीचे नेटवर्क मिळत नाही, अशी स्थिती आहे.