गुहागरातील तीन महिलांना १० वर्षाची सक्तमजुरी, विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्षा

By संदीप बांद्रे | Published: January 25, 2024 05:57 PM2024-01-25T17:57:49+5:302024-01-25T17:58:08+5:30

चिपळूण : गुहागर तालुक्यातील असगोली खारवीवाडी येथील विवाहितेचा तब्बल ११ वर्षे छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी येथील ...

Three women from Guhagar were sentenced to 10 years of Punishment for inciting a married woman to commit suicide | गुहागरातील तीन महिलांना १० वर्षाची सक्तमजुरी, विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्षा

गुहागरातील तीन महिलांना १० वर्षाची सक्तमजुरी, विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्षा

चिपळूण : गुहागर तालुक्यातील असगोली खारवीवाडी येथील विवाहितेचा तब्बल ११ वर्षे छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी येथील अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधिश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी तीन महिलांना १० वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी ८ हजारा रूपये दंड अशी शिक्षा गुरूवारी ठोठावली.

यामध्ये विवाहितेची सासू हिरा मधूकर नाटेकर, जाऊ प्रतिभा नितीन नाटेकर व नणंद पुष्पा रत्नाकर जांभारकर या महिलांचा समावेश आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणात मयत विवाहीत महिलेचा मृत्यूपुर्व जबाब आणि नवऱ्यासहीत ९ जणांची साक्ष महत्वाची ठरली.

असगोली खारवीवाडी येथे १४ सप्टेंबर २०१७ रोजी विवाहीता कै. आरती मंगेश नाटेकर हिने स्वतःला पेटवून आत्महत्या केली होती. त्यावेळी त्यांच्या लग्नाला सुमारे ११ वर्षांचा कालावधी झाला होता. तिला निल नावाचा दहा वर्षाचा मुलगा आहे. पती मंगेश मधूकर नाटेकर हा मुंबई येथे मासेमारीचा व्यवसाय करतो. सासू, जाऊ आणि नणंद या तिघींनी आरती नाटेकर हिचा वारंवार छळ करीत तिला सातत्याने घर सोडून जाण्यासाठी प्रवृत्त केले जात होते. तिचा वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळही केला जात होता.

या सततच्या त्रासाला कंटाळून आरती मंगेश नाटेकर हिने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये ती ९५ टक्के भाजली होती. तातडीने तिला सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. यावेळी तिने या तिघी विरूद्ध तक्रार दिली होती. त्यानुसार त्यांच्याविरूद्ध ४९८ (अ), व ५०४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. आरती रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असतानाच मयत झाली. 

त्यामुळे या प्रकरणी ३०६ हे वाढीव कलम लावून हा खटला चिपळूण जिल्हा न्यायालयामध्ये सुरू होता. सरकार पक्षातर्फे अॅड. प्रफुल्ल साळवी यांनी एकूण ९ साक्षीदार तपासले. खटल्यातील मृत्यूपूर्व जबाब आत्महत्येस प्रवृत्त करणे व छळ याबाबी सिद्ध करण्यासाठी विविध न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले. सर्व साक्षीपुरावा व सरकारी पक्षाचा युक्तिवाद तसेच आरतीच्या नवऱ्याने सत्याची बाजू मांडत आपली आई, बहिण व भावजय यांचेविरूध्द दिलेली साक्ष ग्राह्य मानण्यात आली. त्याप्रमाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी तिनही महिलांना दोषी ठरवून  कलम ३०६ अन्वये १० वर्षे सक्तमजूरी व ५ हजार रूपये दंड, कलम ४९८ (अ) गुन्ह्यासाठी ३ वर्षे सक्तमजूरी व प्रत्येकी २ हजार रूपये दंड, ५०४ गुन्ह्यासाठी २ वर्षे साधा कारावास व १ हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. 

या गुन्ह्याचा पोलिस उपनिरीक्षक दिलीप जाधव यांनी केला. पोलिस हेड कॉन्स्टेंबल प्रदीप भंडारी यांनी सरकार पक्षास मदत केली. महिलेनेच, महिलेविरूध्द केलेल्या गुन्ह्यामध्ये देखील न्यायालयासमोर सबळ पुरावा आल्यास शिक्षा दिली जाते, असे प्रतिक्रीया सरकारी वकिलांनी दिली.

Web Title: Three women from Guhagar were sentenced to 10 years of Punishment for inciting a married woman to commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.