शाळा सुटल्यानंतर तीन वर्षांनी दहावी, शौनक जोशीची परिस्थिती बेताची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 06:31 PM2019-06-11T18:31:35+5:302019-06-11T18:33:26+5:30
कित्येक मुले आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी केवळ शिक्षणाच्या प्रेमापोटी परिश्रमपूर्वक अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत पुढे जात आहेत. गणपतीपुळे येथील शौनक गजानन जोशी या मुलानेही सातवीनंतर शिक्षण थांबले असतानाच रत्नागिरीतील रामकृष्ण सुर्वे दहावी अभ्यास वर्गात प्रवेश घेऊन दहावीत ६६ टक्के गुण मिळविले आहेत. विशेष म्हणजे वेदाभ्यास करत असतानाच त्याने ही परीक्षा दिली.
शोभना कांबळे
रत्नागिरी : कित्येक मुले आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी केवळ शिक्षणाच्या प्रेमापोटी परिश्रमपूर्वक अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत पुढे जात आहेत. गणपतीपुळे येथील शौनक गजानन जोशी या मुलानेही सातवीनंतर शिक्षण थांबले असतानाच रत्नागिरीतील रामकृष्ण सुर्वे दहावी अभ्यास वर्गात प्रवेश घेऊन दहावीत ६६ टक्के गुण मिळविले आहेत. विशेष म्हणजे वेदाभ्यास करत असतानाच त्याने ही परीक्षा दिली.
शौनकचे वडील गणपतीपुळे येथील मंदिरात पुजारी आहेत. लहान बहीण शिवानी आता नववीत आहे. रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालयात सातवी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या शौनकने वेदाभ्यास करावा, अशी त्याच्या वडिलांची इच्छा असल्याने त्यांनी त्याला अलिबाग येथील वेद पाठशाळेत प्रवेश घेऊन दिला. या शाळेत तीन वर्षे झाल्यानंतर त्याला काही कारणास्तव ही शाळा सोडावी लागली आणि तो परत घरी आला.
त्याला रत्नागिरीच्या वेदपाठ शाळेत प्रवेश घेतल्याने तो रत्नागिरीत त्याच्या काकांकडे राहू लागला. हा अभ्यासक्रम पूर्ण करतानाच दहावीची परीक्षा देण्याची त्याची तीव्र इच्छा होती. ती पूर्णही झाली. रत्नागिरीतील गरजू आणि आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या स्वराज्य संस्था चालवीत असलेल्या कै. रामकृष्ण सदाशिव सुर्वे दहावी अभ्यास वर्गाविषयी त्याला माहिती मिळाली. ही संस्था गेली आठ वर्षे अशा मुलांना अभ्यासात मदत करून बाहेरून दहावीची परीक्षा देण्यास मदत करीत आहे. या अभ्यासवर्गातून अनेक मुले दहावी परीक्षा उत्तीर्ण करून आज स्वत:च्या पायावर उभी आहेत. काही पुढचे शिक्षण घेत आहेत.
शौनकने दहावीची परीक्षा देण्याची इच्छा व्यक्त करताच स्वराज्य संस्थेचे जितेंद्र शिवगण यांनी त्याला मदत करून या अभ्यासवर्गात बसवले. ऑगस्टमध्ये या अभ्यासवर्गात आलेल्या शौनकने मन लावून अभ्यास करण्यास सुरूवात केली. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत दहावी अभ्यासवर्ग, त्यानंतर २ ते ६ वेद पाठशाळा असे दोन्ही अभ्यासक्रम सांभाळत त्याने परीक्षेची तयारी सुरू केली. घरी आल्यानंतर तो दोन तास नेटाने अभ्यास करायचा. काही वेळा तो पौरोहित्यासाठीही जायचा.
अभ्यासवर्गात मार्गदर्शन करणाऱ्या सुवर्णा चौधरी, सोनाली डाफळे, दीपाली डाफळे, पल्लवी पवार, कुशल जाधव, सुविधा गाडेकर, अपेक्षा पाटील यांनी त्याला शिकविण्यास सुरूवात केली. यावेळी दहावीचा अभ्यासक्रम बदलला असल्याने या सर्वांकरिता आव्हानच होते. त्यातच यावर्षीपासून मिळणारे अधिकचे २० गुणही बंद करण्यात आले आहेत. मात्र, या मार्गदर्शनामुळे आणि शौनकच्या मेहनतीमुळे यश मिळाले. बाहेरून परीक्षा देऊनही शौनकला दहावीत ६६ टक्के गुण मिळाले आहेत.
वेदाभ्यास सुरूच
तो करीत असलेला वेदाभ्यास बारा वर्षांचा आहे. त्यातील तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. पुढचा अभ्यास तो सुरूच ठेवणार आहे. याचबरोबर आणखी दोन वर्षांनंतर तो बाहेरून बारावीचीही परीक्षा जिद्दीने देणार आहे. शिकण्याची जिद्द त्याच्या चेहऱ्यावर दिसते.