पोहायला गेलेल्या तरुणांपैकी तिघे बुडाले; एक मृत, एक बेपत्ता, एक बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:39 AM2021-09-16T04:39:56+5:302021-09-16T04:39:56+5:30
देवरुख : पोहायला गेलेल्या तरुणांपैकी तिघेजण बुडाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील पूर झेपलेवाडी येथे घडली असून, त्यातील एकाचा मृतदेह हाती ...
देवरुख : पोहायला गेलेल्या तरुणांपैकी तिघेजण बुडाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील पूर झेपलेवाडी येथे घडली असून, त्यातील एकाचा मृतदेह हाती आला आहे, दुसरा बेपत्ता आहे तर तिसऱ्याला वाचवण्यात यश आले आहे. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी आलेले अशोक सोनू झेपले (वय सुमारे ३८) यांचा मृत्यू झाला असून, संजय सीताराम घाटकर (वय सुमारे ४८) हे बेपत्ता आहेत. त्यांचा मुलगा हर्ष संजय घाटकर याला वाचवण्यात यश आले आहे.
देवरुख पोलीस स्थानकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूर झेपलेवाडीतील गौरव दत्ताराम झेपले याने या प्रकाराची खबर पोलीस स्थानकाला दिली. सप्तलिंगी नदीपात्रात जिल्हा परिषद शाळेनजीक असणाऱ्या जांभळीचे उतरण या ठिकाणी सात ते आठ तरुण पोहायला गेले होते. यातील बहुतेकजण हे मुंबईहून गणेशोत्सवासाठी गावी आले आहेत.
गेले चार दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असल्याने नदी तुडुंब भरून वाहत होती. पोहायला गेलेल्या तरुणांपैकी तिघेजण बुडू लागले. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न बाकीच्या तरुणांनी केला; मात्र त्यातील अशोक सोनू झेपले यांचा बुडून मृत्यू झाला. संजय घाटकर बेपत्ता असून, त्यांचा मुलगा हर्ष सुदैवाने वाचला आहे. त्याला देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशोक झेपले यांचा मृतदेह नदीवरील बंधाऱ्यानजीक सापडला. ही घटना पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. अशोक झेपले यांच्या मृतदेहाचे विच्छेदन संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा करण्यात आले.
ही माहिती मिळताच देवरुख पोलीस स्थानकाचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. स्थानिक ग्रामस्थांनी बुडालेल्या तरुणाचा शोध लगेचच सुरू केला. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल जे. एस. तडवी करीत आहेत.