हंडीच्या थराराने राजकारण ढवळले
By Admin | Published: August 26, 2016 10:04 PM2016-08-26T22:04:29+5:302016-08-26T23:17:30+5:30
सांस्कृतिक राजधानी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उत्सवाचा आधार
सुभाष कदम -- चिपळूण
रत्नागिरी जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या चिपळूण तालुक्यात दहीहंडी उत्सव शांततेत पार पडला. आगामी काळ हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी जनतेच्या संपर्कात येण्यासाठी चढाओढ सुरु केली होती. अनेक इच्छुक उमेदवारांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत या उत्सवाची नजाकत वाढविली होती. तालुक्यात हा उत्सव शांततेत पार पडला.
गोविंदा रे... गोपाळा म्हणत गोकुळाष्टमीच्या उत्सवाला असलेला गोविंदांचा उत्साह तसाच दहीहंडी फोडेपर्यंत कायम होता. यावर्षी नगर परिषदेच्या निवडणुका असल्याने शहरातील सार्वजनिक दहीहंड्यांच्या ठिकाणी राजकीय पुढारी व विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची रेलचेल दिसून येत होती. दिवसभर कडाक्याचे ऊन पडले होते. त्यामुळे सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरातील सर्वच मंडळांच्या दहीहंडींजवळ शुकशुकाट होता. त्यानंतर हळूहळू गर्दी होऊ लागली. सायंकाळी ७ ते ९ या दोन तासात इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, बहादूरशेख नाका व जुना एस. टी. स्टॅण्ड परिसर माणसांनी फुलला होता.
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे काँग्रेसची दहीहंडी होती. येथे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार नीलेश राणे व मराठीतील आघाडीचा नायक संजय नार्वेकर उपस्थित होते. येथील सांस्कृतिक केंद्राची लवकरच दुरुस्ती करावी, अशी मागणी यावेळी नार्वेकर यांनी केली. चिपळूण नगर परिषदेत राष्ट्रवादी व काँगे्रस सत्तेत आहेत. २००५ नंतर प्रलंबित असलेले सांस्कृतिक केंद्राचे काम सध्या सुरु आहे. त्यावरुन रणकंदन सुरु असतानाच नार्वेकर यांनी पुन्हा एकदा या विषयाला वाचा फोडली. यावेळी करमणुकीच्या कार्यक्रमाचेही आयोजन केले होते. तर बाजूलाच वेसमारुती मंडळाची दहीहंडी होती.
जिप्सी कॉर्नर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दहीहंडी होती. येथे तालुकाध्यक्ष संतोष नलावडे व सहकारी उपस्थित होते. महाडजवळ सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेतील प्रत्यक्षदर्शी बसंत कुमार याला यावेळी मनसेकडून सन्मानित करण्यात आले. मनसेचे संतोष नलावडे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी त्याला सन्मानित केले. मनसेच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निकम यांनी हजेरी लावत आपली राजकीय परिपक्वता सिध्द केली. निवडणुकीत राजकारण व इतरवेळी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव कायम आहे. शेवटी माणुसकी श्रेष्ठ असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून सिध्द केले. शिवाजी चौक व बहादूरशेख येथे शिवसेनाप्रणित मंडळांच्या दहीहंड्या होत्या. येथे सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. परिसरात भगवे झेंडे लावून वातावरण निर्मिती करण्यात आली होती. आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, क्षेत्रप्रमुख बाळा कदम, शहरप्रमुख राजू देवळेकर, नगरसेवक शशिकांत मोदी, विभागप्रमुख उमेश सकपाळ यांच्यासह सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
शिवाजी चौक येथे भारतीय जनता पक्षाने प्रथमच दहीहंडी बांधली होती. येथे माजी आमदार व प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस नीलम गोंधळी, तालुकाध्यक्ष रामदास राणे, सरचिटणीस संतोष वरेकर, सचिव विनोद भोबस्कर, महिला तालुकाध्यक्षा मृणालिनी रावराणे, माजी नगरसेवक विजय चितळे, शहराध्यक्ष वैशाली निमकर, मधुकर निमकर, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा सरचिटणीस झुल्फी पेवेकर, महेश दीक्षित, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी क्रीडा क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
जुना एस. टी. स्टॅण्ड येथे माजी आमदार व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष रमेशभाई कदम प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी बांधण्यात आली होती. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी माजी आमदार कदम, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, गटनेते राजेश कदम, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर, प्रा. विनायक होमकळस, पाणीपुरवठा सभापती रुक्सार अलवी, आरोग्य सभापती आदिती देशपांडे, अॅड. जीवन रेळेकर, अर्बन बँक संचालिका गौरी रेळेकर, नासीर खोत, रोशन दलवाई यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. भाजी मंडई, दादा प्रतिष्ठान, छत्रे मारुती, मच्छीमार्केट भागातील हंड्या सायंकाळी फोडण्यात आल्या. कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
काँग्रेसच्या व्यासपीठावर सेलिब्रेटी संजय नार्वेकर.
मनसेच्या व्यासपीठावर महाड अपघातातील देवदूत बसंत कुमार.
सर्वच दहीहंडीच्या ठिकाणी राजकीय पदाधिकाऱ्यांची रेलचेल.
नगर परिषदेसाठी इच्छुक असणाऱ्यांनीही केले पुढारपण.
चिपळूणमध्ये पाच थरापर्यंत सर्वच हंड्या फुटल्या.
शहर परिसरात दहीहंडी उत्सव शांततेत, कोठेही अनुचित प्रकार नाही.