रत्नागिरी जिल्ह्यात साडे तीन हजार दहीहंड्यांचा थरार, गोविंदा पथके सज्ज
By मेहरून नाकाडे | Published: September 6, 2023 12:49 PM2023-09-06T12:49:05+5:302023-09-06T12:49:45+5:30
लाखोंची बक्षिसे जाहीर
रत्नागिरी : जिल्ह्यात दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. गुरूवार दि. ७ सप्टेंबर रोजी दहीकाला उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्ताने जिल्हयात यावर्षी ३०९ सार्वजनिक तर ३०४३ खासगी दहीहंडया उभारण्यात येणार आहेत. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनीही दहीहंडीसाठी लाखो रूपये किमंतीची बक्षिसे जाहीर केली आहेत. त्यामुळे दहीहंडीचा जल्लोष व पारितोषिके मिळविण्यासाठी मंडळामंडळांमधील चुरस व थरार अनुवयास मिळणार आहे.
जिल्ह्यात गतवर्षी (२०२२) २५१ सार्वजनिक तर २३३९ खासगी दहीहंड्या उभारण्यात आल्या होत्या, तर आठ ठिकाणी दहीहंडीनिमित्त मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. मात्र गतवर्षीपेक्षा यावर्षीच्या दहीहंड्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जिल्हयात उभारण्यात येणाऱ्या विविध शहरातील सात ते आठ थर असणाऱ्या हंड्या फोडण्यासाठी जिल्हयातील पथकांसह जिह्याबाहेरची पथकेही येतात.
सध्या दहीहंडयांच्या थरांबरोबर ठेवण्यात आलेल्या बक्षिसांच्या रकमेमध्येही स्पर्धा लागली आहे. दहीहंडीला राजकीय स्पर्धेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. विविध ठिकाणी राजकीय पक्षांकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून सिनेकलाकार, वाहिन्यांचे कलाकार, आॅर्केस्ट्रा अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. सर्वाधिक दहीहंडया जयगड, खेड, दापोली, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, मंडणगड, बाणकोट, दाभोळ येथे फोडण्यात येणार आहेत.
जिल्हाभरातील दहीहंड्यांची पोलीस स्थानक निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे :
पोलीस स्थानके - सार्वजनिक - खासगी
रत्नागिरी शहर - ९ - ९०
रत्नागिरी ग्रामीण - ० - १८२
जयगड - ५९ - ८१
राजापूर - ४० - ७०
नाटे - ३० - ८५
देवरुख - ९ - ५०
सावर्डे - २ - ४५
चिपळूण- १५ - २९०
अलोरे - ६ - ३०
गुहागर - १ - २२५
खेड - २४ - ५००
दापोली - ३८ - ३२७
मंडणगड - १९ - १७९
बाणकोट - १ - ३८९
पूर्णगड - १५ - ३०
दाभोळ - ४ - २५७