हवामानातील बदलामुळे हापूसवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव, फवारणी वाढल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 12:24 PM2024-01-05T12:24:52+5:302024-01-05T12:25:10+5:30
रत्नागिरी : हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर सातत्याने होत आहे. सध्या मोहोर व फळधारणेवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाल्याने पीक वाचविण्यासाठी ...
रत्नागिरी : हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर सातत्याने होत आहे. सध्या मोहोर व फळधारणेवर थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाल्याने पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना विविध उपाययोजना कराव्या लागत आहेत. हवामानातील बदलाचा अंदाज घेत दर १० ते १५ दिवसांनी कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. कीटकनाशके महागडी असल्याने खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
देशातीलच नव्हे तर परदेशी नागरिकांना भुरळ घातलेल्या आंबा पिकावर जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून आहे. फयान वादळानंतर जिल्ह्यातील आंबा उत्पादन दिवसेंदिवस खालावत असल्याने त्याचा फटका बागायतदारांना बसत असून, बागायतदारांची आणि पर्यायाने जिल्ह्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने ऑक्टोबर हीट चांगलीच जाणवली. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये थंडी सुरू होताच आंब्याला मोहोर सुरू झाला. अवकाळी पावसामुळे मोहोरावर परिणाम झाला. काही ठिकाणी मोहोर खराब झाला. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात मोहोर मात्र टिकून आहे.
पहिल्या मोहोराचा आंबा पाच ते दहा टक्केच शिल्लक राहिला आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात सर्वत्र मोहोर चांगला आला आहे. काही ठिकाणी फळधारणा अद्याप व्हायची आहे, तर काही ठिकाणी कणी, तर काही ठिकाणी सुपारी एवढा आंबा झाडावर आहे. हा आंबा मार्चमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. दोन आठवड्यांपूर्वी तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, बागायतदारांनी योग्य उपाययोजना केल्याने तुडतुडा आटोक्यात आणण्यात यश आले होते; परंतु तुडतुड्याचा प्रादुर्भाव वारंवार होत असल्याने शेतकऱ्यांना आटोक्यात आणणे अवघड बनले आहे. वास्तविक प्रत्येक फवारणीत २० ते २५ दिवसांचा फरक असणे आवश्यक आहे. मात्र, कीटकनाशकांचा प्रभाव पडत नसल्याने १० ते १५ दिवसाने फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे खर्च वाढला आहे.
पावसाळी ढगाळ हवामानामुळे बुरशीजन्य कीडरोगाचा प्रभाव वाढला होता, त्यासाठी उपाययोजना करून कीडरोगावर नियंत्रण आणले आहे; परंतु ढगाळ हवामान, थंडी यामुळे आता थ्रीप्सचा प्रादुर्भाव वाढला आहे. थ्रीप्स आटोक्यात आणण्यासाठी बागायतदारांना महागड्या कीटकनाशकांचा वापर करावा लागत आहे. बाजारात महागडी कीटकनाशके असली तरी थ्रीप्स वेळीच नियंत्रणात येणे गरजेचे आहे. आंब्यावरील कीडरोग, तुडतुडा, थ्रीप्स नियंत्रणासाठी वापराव्या लागणाऱ्या कीटकनाशकांच्या किमती अधिक आहेत. त्यामुळे बागायतदारांसाठी आंबा पीक खर्चिक बनले आहे.
आंबा लागवड क्षेत्र - ६६ हजार ४३३ हेक्टर
उत्पादन - एक ते सव्वा लाख टन
दरवर्षीची उलाढाल - ७०० ते ८०० कोटी
यावर्षी फुलोरा चांगला असल्याने सध्या तरी समाधानकारक चित्र आहे. आंबा पिकासाठी नीचांक तापमान व अवकाळी पाऊस मात्र धोकादायक ठरणार आहे. सध्या चित्र समाधानकारक असले तरी प्रत्यक्ष फेब्रुवारीत आंब्याचे प्रत्यक्ष चित्र स्पष्ट होणार आहे. हवामानातील बदलाचा अंदाज घेत तुडतुडा, कीडरोग, थ्रीप्सपासून रक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागत आहेत. - आनंद देसाई, बागायतदार.