रत्नागिरी : निर्मल सागर तट अभियान मोहिमेच्या माध्यमातून हर्णै बंदराला मिळणार शुद्ध पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 06:25 PM2018-02-06T18:25:07+5:302018-02-06T18:31:46+5:30
निर्मल सागर तट मोहिमेच्या माध्यमातून हर्णै ग्रामपंचायतीने शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी सिल्बरब्राऊर इंडिया, पुणे या कंपनीशी करार केला आहे. लोकांना अल्प दरात शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे.
दापोली : हर्णै बंदरात दररोज हजारो लोक मच्छी लिलावासाठी येत असतात. स्थानिक मच्छीमार व पर्यटकांना हर्णै बंदरात पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नव्हते. त्यामुळे निर्मल सागर तट मोहिमेच्या माध्यमातून हर्णै ग्रामपंचायतीने शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी सिल्बरब्राऊर इंडिया, पुणे या कंपनीशी करार केला आहे. लोकांना अल्प दरात शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे.
बंदरातील पाणी समस्या दूर व्हावी, यासाठी पाणी कमिटी अध्यक्ष अस्लम अकबाणी यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. येथे हजारो पर्यटक येत असतात. परंतु बंदरावर शुद्ध पाणी मिळत नव्हते. आता ग्रामपंचायतीने सिल्बरब्राऊर कंपनीशी पाच वर्षांचा करार केल्यामुळे आरो प्लँटमधून शुद्ध पाणी मिळणार आहे.
२० ते ३० पैसे दर
मच्छीमार व पर्यटकांना केवळ २० ते ३० पैसे दराने शुद्ध पाणी उपलब्ध होणार असल्याने २० रुपये बॉटल घेण्याची गरज नाही. हर्णैतील पाणी समस्या दूर होणार असून, ग्रामपंचायतीने शुद्ध पाणी उपलब्ध करुन दिले आहे. हा प्लँट सुरळीत चालावा, यासाठी कर्मचाऱ्यांची २४ तास नियुक्ती करण्यात येणार आहे.
पाठपुराव्याला यश
हर्णै बंदरातील पाणी समस्या दूर झाल्याने लोकांना शुद्ध पाणी मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांची ही मागणी होती. आता ती पूर्णत्त्वास जात असल्याचा आनंद वाटतो. मी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचा आनंद आहेच; परंतु लोकांना अल्पदरात शुध्द पाणी मिळणार, याचे समाधान आहे.
- अस्लम अकबाणी,
पाणी कमिटी अध्यक्ष